कर्जत तालुक्यात ७० टक्के मतदान
By admin | Published: February 22, 2017 06:47 AM2017-02-22T06:47:25+5:302017-02-22T06:47:25+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकरिता मंगळवारी मतदान झाले. कर्जत तालुक्यात सकाळी मतदान
कर्जत : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकरिता मंगळवारी मतदान झाले. कर्जत तालुक्यात सकाळी मतदान अगदी धिम्या गतीने होत होते. मात्र, दुपारनंतर सर्वच मतदान केंद्रांवर मतदानाचा वेग वाढला व तालुक्यात सुमारे ७० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा निवडणूक विभाग तर पंचायत समितीचे बारा निर्वाचक गण आहेत. तालुक्यातील १७२ मतदार केंद्रांवर १ लाख ३१ हजार १६१ मतदार असून त्यामध्ये ६७ हजार ८४३ पुरु ष मतदार, तर ६३ हजार ३१८ महिला मतदार आहेत. सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ झाला. मात्र, तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर साडेअकरापर्यंत ११ ते १५ टक्केच मतदान झाले होते. दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली आणि मतदानाचा वेग वाढला. दुपारी ४पर्यंत ७१ हजार ७५१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ३७ हजार ०६७ पुरुष मतदारांचा तर ३४ हजार ६८४ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदान संपेपर्यंत ७० टक्के मतदान होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन प्रभाग अनुसूचित जमातीकरिता आरक्षित असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुक उमेदवारांची निराशा झाली. त्यामुळे मतदान केंद्राच्या परिसरात त्यांची उपस्थिती फक्त नावापुरतीच दिसत होती. बीड बुद्रुक जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या वेणगाव पंचायत समिती निर्वाचक गणात मोठ्या वेणगाव गावात राष्ट्रवादी- शेतकरी कामगार पक्ष-स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आघाडीच्या व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ हाणामारी झाल्याची घटना घडली. ही घटना वगळता तालुक्यात मतदान शांततेत पार पडले.