भिवंडी : महानगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय चालविण्यासाठी नेमलेले शौचालय परिचालक शौचालयासाठी चोरीची वीज वापरत असून, त्यापैकी गायत्रीनगरमधील शौचालयात वीज कंपनीने पकडलेल्या वीजचोरीचे ६९,५०० रुपये वीजबिल शौचालय चालकास दिले आहे.मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अंतर्गत भिवंडी महानगरपालिका क्षेत्र येत आहे. या परिसरात स्वच्छता ठेवण्याच्या उद्देशाने शहरात एकूण २०७ शौचालये बांधली असून, त्यापैकी १३५ शौचालये सुरू आहेत. ही १३५ शौचालये चालवून त्यांची देखभाल करण्यासाठी पालिका प्रशासनाने नियमबाह्य व अवैधरीत्या खासगी संस्थाचालकांची परिचालक म्हणून नेमणूक केली आहे. त्या संस्थांशी केलेल्या करारानुसार वीजबिल व पाणीबिल त्यांनी भरले पाहिजे, परंतु हे संस्थाचालक चोरीची वीज वापरत आहेत, तसेच मनपाची पाणीपट्टी न भरता चोरीचे पाणीकनेक्शन घेतले आहेत. काही शौचालयचालकांनी मनपाच्या सिटी लाइटच्या खांबावरून वीजपुरवठा घेऊन रात्रंदिवस वापरत आहेत. तरीदेखील मनपा अधिकारी शौचालय परिचालकांवर कोणतीही फौजदारी तक्रार करण्यास तयार नाही. त्यामुळे ही पाणीचोरी व वीजचोरी मनपा अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. ज्या शौचालयांत वीज कंपनीची वीज चोरली जाते, तेथे वीज कंपनीच्या भरारी पथकाने धाड टाकून वीजचोरी पकडली आहे. त्यानुसार, गायत्रीनगर किराणा दुकानाशेजारी असलेल्या शौचालयाला ६९ हजार ५०० रुपयांचे बिल भरण्याची नोटीस दिली आहे. हे बिल मनपाच्या मालमत्तेवर लागू केल्याने ते मनपास भरावे लागणार आहे, अशी चर्चा परिसरातील नागरिकांत सुरू असून सरकारी मालमत्तेचा नियमबाह्य उपयोग केल्याप्रकरणी परिचालक संस्थेवर मनपा प्रशासन फौजदारी करणार काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
शौचालय चालकाकडून ७० हजारांची वीजचोरी
By admin | Published: November 16, 2015 3:37 AM