७०० किमी पीठ, मीठ, गॅस दुचाकीला बांधून आणला; घरूनच आणले सर्व अत्यावश्यक साहित्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 08:09 AM2024-01-26T08:09:05+5:302024-01-26T08:09:37+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये धनाजी जाधव पाटील दुपारी दोन वाजता दाखल झाला.
नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या दिंडीमध्ये नांदेडमधील धनाजी जाधव हा तरुण शेतकरीही सहभागी झाला आहे. मोटारसायकलवर ७०० किलोमीटर प्रवास करून नवी मुंबईत दाखल झाला. मोटारसायकलवर गॅस, चटणी, मीठ, पीठ व जेवण बनविण्याचे सर्व साहित्य घरून घेऊनच आला आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये धनाजी जाधव पाटील दुपारी दोन वाजता दाखल झाला. मोटारसायकलवर लावलेला ‘आरक्षणाचे तोरण बांधले, नाही कुणाची भीती, लाख संकटे झेलून जाती अशी मराठी ख्याती’, असा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. चलो मुंबई, झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छता राखा असे फलकही मोटारसायकलवर लावण्यात आले होते. मोटारसायकलच्या मागील बाजूला जेवण चटई, बिछाना, गॅस, चटणी, मीठ, पीठ, डाळी, कांदा, लसूण असे स्वयंपाक बनविण्यासाठीचे सर्व साहित्य ठेवले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सर्व तयारीनिशी निघा अशा सूचना दिल्यामुळे ही सर्व तयारी केली असल्याचे त्याने सांगितले.
नांदेडमधील कंधार तालुक्यातील मोहिजा पटांडा गावातील शेतकरी असलेला धनाजी जाधव पाटील याने आवश्यकता भासल्यास स्वत:च स्वयंपाक बनविण्याची तयारी केली होती. आवश्यक ते सर्व साहित्य बरोबर घेतले. आतापर्यंत प्रवासात मराठा बांधवांनी सर्व ठिकाणी योग्य पाहुणचार केल्याने प्रत्यक्षात स्वयंपाक बनविण्याची वेळ आली नाही, असे धनाजी जाधव यांनी सांगितले.