नवी मुंबई : सानपाडा येथील मिलिनियम टॉवर्सच्या मागील बाजूच्या मोकळ्या भूखंडावर उभारलेल्या बेकायदा झोपड्यांवर सिडकोच्या वतीने मंगळवारी धडक कारवाई करण्यात आली. यावेळी पन्नासपेक्षा अधिक झोपड्या जमीनदोस्त करून सुमारे ७000 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला.सिडकोच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिडकोच्या मालकीच्या विविध प्रयोजनासाठी आरक्षित असलेल्या मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. हे भूखंड अतिक्रमणमुक्त करून त्यांना कुंपण घालण्याची मोहीम सिडकोने हाती घेतली आहे. त्यानुसार मंगळवारी सानपाडा येथील मिलिनियम टॉवर्स या वसाहतीच्या मागील बाजूला असलेला मोकळा भूखंड रिकामा करण्यात आला. विशेष म्हणजे याअगोदरही येथील अतिक्रमणांवर सिडकोच्या वतीने कारवाई करण्यात आली होती. परंतु काही दिवसांतच झोपड्या पुन्हा उभारल्या होत्या. त्यामुळे मंगळवारी ही धडक कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर मोकळ्या झालेल्या भूखंडाला पुन्हा कुंपण घालण्यात आले आहे. दरम्यान, या भूखंडांवर पुन्हा अतिक्रमण होवू नये, यादृष्टीने सिडकोच्या संबंधित विभागाकडून कठोर उपाययोजना करण्यात आल्याचे सिडकोकडून स्पष्ट केले आहे.
सानपाड्यातील 7000 मीटरचा भूखंड अतिक्रमणमुक्त
By admin | Published: April 27, 2017 12:15 AM