जमीन बळकावण्यासाठी सातबाराच बदलला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 08:12 AM2023-11-23T08:12:37+5:302023-11-23T08:13:01+5:30
बोगस मृत्यू दाखल्याद्वारे स्वत: झाले वारस, ७ जणांवर गुन्हा
नवीन पनवेल : जमीन बळकावण्यासाठी खैरणे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावे बोगस मृत्यू दाखला तयार करून सातबारा उताऱ्यावरून नाव कमी करून स्वतःला वारस बनवले. या फसवणूक प्रकरणी सात जणांविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बाबू नारायण सिनारे हे सेवानिवृत्त असून, ते डोंबिवली येथे राहतात. त्यांचे वडील नारायण सिनारे यांचे निधन झाले असून, त्यांना गुणीबाई खंडू सिनारे ही बहीण होती. तिचे लग्न देवीचा पाडा येथे राहणारे हशा फडके यांच्यासोबत झाले होते. कालांतराने हशा फडके हे मयत झाले व गुणीबाई सिनारे यांची सवत हीदेखील मयत झाली. त्यानंतर गुणीबाई सिनारे-फडके या त्यांच्यासोबत डोंबिवली येथे राहण्यास आल्या. २००० मध्ये त्याही मृत पावल्या. त्यावेळी त्यांनी १९९५ रोजी इच्छापत्र लिहून देऊन तिच्या सासरकडील प्रॉपर्टी हे तिच्या मृत्यूनंतर भावाचा मुलगा बाबू नारायण सिनारे यास देण्यात यावी, असे इच्छापत्र केले होते.
हशा फडके यांची देवीचा पाडा येथे वडिलोपार्जित जमीन होती, मात्र गुणीबाई सिनारे-फडके यांच्या मृत्यूनंतर सासरच्या माणसांनी तिच्या हिश्शाची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे बाबू सिनारे यांना समजले.
ग्रामपंचायतीकडे नोंदच नाही
मृत्यू दाखल्याची माहिती खैरणे ग्रामपंचायतीकडून घेतली असता कार्यालयाकडून गुणीबाई नथू पाटील या नावाने कोणताही मृत्यू दाखला दिला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मृत्यू दाखला हा बनावट असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कशी लागली वारसांची नावे?
२००९ ते २०१० दरम्यानचे गुणीबाई यांच्या नावावर असलेल्या जमिनीचे फेरफार उतारे काढले असता सात-बारा उतारावरून गुणीबाई सिनारे-फडके यांचे नाव कमी करून ठमूबाई रामा फडके, ताईबाई रामा फडके, महादेव रामा फडके, ज्ञानदेव रामा फडके, इंद्रा ऊर्फ इंदिरा रामा पाटील, मीना नाना पाटील, पुष्पा जयवंत भोईर यांनी त्यांची नावे वारस म्हणून लावल्याचे समोर आले.
ही नावे वारस म्हणून कशी लागली याची माहिती अधिकाऱ्यांन्वये कागदपत्रे प्राप्त केली. यावेळी गुणीबाई नथू पाटील या नावाने खैरणे ग्रामपंचायतमधून प्राप्त केलेल्या मृत्यू दाखल्याचा वापर करून सात-बारावर त्यांची नावे लावल्याचे समोर आले. गुणीबाई यांचा मृत्यू डोंबिवली येथे झाल्याने मूळ मृत्यू दाखला बाबूराव सिनारे यांच्याकडे आहे.