वैभव गायकरपनवेल: रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील 7/12 संपूर्ण ऑनलाइन झाले आहेत. यामुळे राज्यात पनवेलचा तिसरा क्रमांक आला असल्याचे तहसीलदार अमित सानप यांनी सांगितले. पनवेल तालुक्यात एकूण 90712 एवढे 7/12 असून, सर्वच्या सर्व सातबारा यापुढे ऑनलाइन मिळणार आहेत. राज्यात यापूर्वी चंद्रपूर आणि परभणी जिल्ह्यातील तालुक्यातील सातबारा ऑनलाइन झाले आहेत. पनवेल हे रायगड जिल्ह्यातील पहिले तसेच शहरी भागातील पहिला तालुका ऑनलाइन तालुका आहे. सातबारा ऑनलाइन करण्याच्या दृष्टीने तहसीलदार अमित सानप यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या मेहनतीला मोठे यश आले आहे.रायगड जिल्ह्यात एकूण 16 तालुके आहेत. या सर्वांना मागे टाकत पनवेल तहसील कार्यालयाने ही बाजी मारली आहे. विशेष म्हणजे राज्यात तिसऱ्या क्रमांकावर येण्याचा मान पनवेल तहसील कार्यालयाने मिळविला आहे. यामुळे शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात खेटे न मारता ऑनलाइन पद्धतीने आपला सातबारा उतारा काढता येणार आहे. सरकारी कार्यालये डिजिटल करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याला पनवेल तहसील कार्यालयाचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
पनवेल तहसील कार्यालयातील 7/12 झाले 100 टक्के ऑनलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 10:14 PM