नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात रविवारी पल्स पोलिओ लसिकरण मोहीम राबविण्यात आली. यासाठी ७३७ बुथ तयार केले होते. यामध्ये १०१ अस्थायी व २८ मोबाइल बुथचाही समावेश आहे. तब्बल ५७ हजार मुलांना लस देण्यात आली असून, उर्वरित मुलांसाठी २ ते ६ नोव्हेंबरदरम्यान घरोघरी जाऊन लस देण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करून सर्व मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. २३ नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून शहरभर आवश्यक त्या ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रुग्णालये या ठिकाणी ६०८ स्थायी बुथ, तसेच रेल्वे स्टेशन, डेपो, टोल नाके येथेही नियोजन केले होते. दिवसभरात महापालिका क्षेत्रातील ५ वर्षांखालील ५७ हजार ७७६ बालकांनी पल्स पोलिओ लसीकरणाचा लाभ घेतला. लस पाजण्यापूर्वी व पाजल्यानंतर हात सॅनिटाइज करण्यात येत होते. लस देताना बालक पालकाकडेच असेल, याची काळजी घेऊन लांबूनच बाळाला स्पर्श न करता, तसेच ड्रॉपरचा स्पर्श बाळाच्या तोंडाला होणार नाही, याची दक्षता घेऊन लस पाजण्यात येत होती. अगदी लसीकरण झाल्याचे फिंगर मार्किंग करतानाह बाळाला स्वयंसेवकाने स्पर्श न करता, बालकाचे बोट पालकांना धरण्यास सांगून फिंगर मार्किंग केले आहे. अशा प्रकारची काळजी सर्व बुथवर घेण्यात आली.
सहकार्य करण्याचे आवाहन नवी मुंबई व पर्यायाने राज्य आणि देश पोलिओमुक्त राहावा, या दृष्टीने पल्स पोलिओ लसीकरण मोहीम महत्त्वाची असून, आरोग्यस्नेही नवी मुंबईकर नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. तथापि, ५ वर्षांखालील ज्या बालकांना लसीकरण झालेले नसेल, अशा बालकांच्या घरांना भेट देणाऱ्या महानगरपालिका स्वयंसेवकांना बालकांबाबत माहिती देऊन पोलिओ डोस पाजून घेण्याबाबत संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.