75% पोलिसांनी घेतला डोस, नवी मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 09:19 AM2021-03-17T09:19:28+5:302021-03-17T09:20:11+5:30
गेल्यावर्षी मार्च महिन्यात नवी मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर काही दिवसांतच शहरात कोरोना रुग्णांची संख्या दोन आकड्यांवर पोहोचली होती.
सूर्यकांत वाघमारे -
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील ७५ टक्के पोलिसांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे, तर १२ टक्क्यांच्या जवळपास पोलिसांनी दुसरा डोस घेतला असून, पुढील काही दिवसांत १०० टक्के पोलिसांचा पहिला डोस पूर्ण होणार आहे. शहरात पुन्हा एकदा कोरोना वाढू लागल्याने पोलिसांमध्येही चिंता वाढू लागली आहे.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात नवी मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर काही दिवसांतच शहरात कोरोना रुग्णांची संख्या दोन आकड्यांवर पोहोचली होती. यादरम्यान लॉकडाऊन लागला असता नवी मुंबईसह पनवेल व उरणची परिस्थिती हाताळताना अनेक पोलीस कोरोनाबाधित झाले होते. त्यात दहाजणांचे प्राण गेले, तर एक हजाराहून अधिकांना कोरोनाचा संसर्ग होऊन त्यातून ते बरे झाले. मागील दोन महिने शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली असता, पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा प्रतिदिनचा आकडा १०० च्या वर पोहोचला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये देखील चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे सर्व पोलिसांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी वरिष्ठांचे प्रयत्न सुरू आहेत.
७५.४८ टक्के पोलिसांनी घेतली लस
- कोरोनावर लस आल्यानंतर प्राधान्याने ती पोलिसांनाही दिली जात आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण चार हजार ७२७ पैकी तीन हजार ५६८ पोलिसांनी पहिली लस घेतली आहे. त्यापैकी कोणालाही कोणताही त्रास झाला नाही. उर्वरित एक हजार १५९ पोलिसांना देखील येत्या काही दिवसांत दिली जाणार आहे. यामुळे कर्तव्य बजावताना एकमेकांच्या संपर्कातून कोरोनाच्या संसर्गाचा धोका टळणार आहे.
- मागील वर्षी लॉकडाऊन दरम्यान बंदोबस्तावर असताना बहुतांश पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यापासून कुटुंबीयांना देखील संसर्ग झाल्याने पोलीस दलाच्या मनुष्यबळावर मोठा परिणाम झाला होता. यावेळी खबरदारी म्हणून आयुक्तालयामार्फत पोलिसांकरिता अनेक उपाय योजना राबविण्यात आल्या होत्या. अशीच परिस्थिती पुन्हा उद्भवू नये याकरिता पोलिसांना लस देण्यास प्राधान्य दिले जात आहे.
१२.८६ टक्के पोलिसांना दुसरा डोस
पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांचा कालावधी पूर्ण करून दुसरा डोस घेण्यासदेखील पोलिसांकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार ६०८ जणांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे, तर लवकरच सर्वच पोलिसांचा पहिला डोस पूर्ण होईल असे मुख्यालय पोलीस उपायुक्त अभिजित शिवथरे यांनी सांगितले.