दारावे तलावासाठी ७५ लाखांचा खर्च; महापालिका करणार सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:04 AM2019-06-08T01:04:39+5:302019-06-08T01:04:45+5:30
महापालिकेने तलाव व्हिजन अंतर्गत शहरातील तलावांची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यास सुरवात केली आहे. दारावे गावामधील नागेश्वर तलावाचीही दुरवस्था झाली आहे.
नवी मुंबई : दारावे सेक्टर २३ मधील तलावाची सुधारणा करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. तलावामधील गाळ काढण्यासह दुरुस्तीचे काम केले जाणार असून त्यासाठी ७५ लाख ८२ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.
महापालिकेने तलाव व्हिजन अंतर्गत शहरातील तलावांची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यास सुरवात केली आहे. दारावे गावामधील नागेश्वर तलावाचीही दुरवस्था झाली आहे. याठिकाणी परिसरातील नागरिक सकाळी व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येत असतात. गणेशविसर्जनही तलावामध्ये केले जाते. तलावामधील गाळ काढून दुरुस्तीचे काम करण्याची मागणी नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी केली होती. नगरसेवक सुनील पाटील यांनीही प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन संरक्षण भिंतीसह नादुरुस्त बांधकामाची सुधारणा करण्यात येणार आहे.
विसर्जनासाठी घाट तसेच दुरुस्तीची सर्व कामे करण्यात येणार आहे. तलावाच्या दुरुस्तीसाठीच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या कामावर ७५ लाख ८२ हजार रुपये खर्च होणार असून, ९ महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे.