जिल्ह्यात सरासरी ७५ टक्के मतदान
By admin | Published: February 22, 2017 06:54 AM2017-02-22T06:54:16+5:302017-02-22T06:54:16+5:30
रायगड जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सुमारे ७५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज
अलिबाग : रायगड जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सुमारे ७५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १८६ तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३८८ असे एकूण ५७४ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद झाले. जिल्ह्यात काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने तेथील मतदान यंत्रे तातडीने बदलण्यात आली. जिल्ह्यामध्ये सर्वत्र शांततेत मतदान पार पडल्याचा दावा प्रशासनाने केला. २३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
अलिबाग तालुक्यात सरासरी ७४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात मतदार संघ, तर १४ पंचायत समितीच्या जागांसाठी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मतदारांच्या लांबच लांब रांगा मतदान केंद्राबाहेर लागल्या होत्या. दुपारी प्रचंड उन्हाच्या झळा असल्याने मतदान केंद्राबाहेरील गर्दी काही अंशी कमी झाली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अलिबाग तालुक्यात ६३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारनंतर पुन्हा मतदार उत्स्फूर्तपणे मतदानाला जात असल्याचे दिसून आले. पुढील दोन तासांमध्ये मतदारांचा मतदानाचा ओघ पाहता सुमारे ७४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज अलिबागचे तहसीलदार प्रकाश सकपाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. तसेच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. अलिबाग तालुक्यात शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, सुप्रिया पाटील, अलिबागचे आमदार सुभाष पाटील, शेकापच्या उमेदवार सुश्रूता पाटील, चित्रा पाटील, शिवसेनेचे महेंद्र दळवी, थळ मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवार मानसी दळवी, काँग्रेसच्या शहापूर मतदार संघातील उमेदवार उज्ज्वला पाटील, वैभव पाटील यांच्यासह काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर, उमेदवार राजा ठाकूर, आप्पा थळे यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
या कें द्रांवरीलमतदान यंत्रांमध्ये बिघाड
च्रोहा तालुक्यातील नागोठणे जिल्हा परिषद गटातील सुकेळी -२ मतदान केंद्रातील मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान सुरू होण्याआधीच तेथील मतदान यंत्र बदलण्यात आले होते. अलिबाग तालुक्यातील मापगाव, बेलोशी, कुÞडूर्स गटातील भोनंग, बोडणी, ताडवागळे केंद्रातील मतदान यंत्र बदलण्यात आले. मतदान यंत्र बदलताना त्या-त्या मतदान यंत्रामध्ये अनुक्रमे १६,३०० आणि २०७ मतदारांनी मतदान के ले. म्हसळातील पाबरे खारगाव, पाबरे देवघर कोंड केंद्रातील मतदान यंत्रे बदलली. उरणमधील विंधणे गणातील चिले गावठाण मतदान केंद्रातील मतदान यंत्रही बदलली. पनवेलमधील गव्हाण गटातील उलवे, गव्हाण बेलपाडा, गव्हाण, डेरवली आणि वहाळ पंचायत समितीमधील मोरावे केंद्रातील यंत्रे तांत्रिक बिघाडामुळे बदलली. सुधागडमधील पाली नाडसुर गणातील सिध्देश्वर बुद्रुक केंद्रामधील यंत्रात ४१३ मतदारांनी मतदान केले, त्यानंतर ते बदलले.