७५,००० ट्रेलर्सचा ‘जेएनपीए’त ठिय्या, बंदरातील आयात-निर्यात ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 02:49 PM2024-01-03T14:49:48+5:302024-01-03T14:50:37+5:30

वाहनचालकांच्या आंदोलनामुळे रेती, माती आणि इतर वाहतूक बंद असल्याने बांधकाम व्यवसायही अडचणीत आला...

75,000 trailers stuck at JNPA, import-export at the port stopped | ७५,००० ट्रेलर्सचा ‘जेएनपीए’त ठिय्या, बंदरातील आयात-निर्यात ठप्प 

७५,००० ट्रेलर्सचा ‘जेएनपीए’त ठिय्या, बंदरातील आयात-निर्यात ठप्प 

उरण : वाहनचालकांच्या आंदोलनामुळे मंगळवारी ‘जेएनपीए’ परिसरात ठिकठिकाणी ७५ हजारांहून अधिक वाहने विविध रस्त्यांवर उभी आहेत. सध्या या बंदरातील ६० टक्के मालवाहतूक ठप्प झाली आहे. सोमवारपासून बंदर आणि परिसरातील १२५ कंटेनर यार्डाद्वारे होणाऱ्या मालाची आयात-निर्यात कोलमडल्याने शेकडो कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

बंदरांवर आधारित १२५ सीएसएफ आणि कंटेनर यार्डातील कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे द्रोणगिरी नोड, पंजाब कॉन्वेअर, आयओटीएल आदी परिसरात ७० हजार कंटेनर ट्रेलर्स उभे असल्याची माहिती उरण वाहतूक नियंत्रण शाखेचे उपनिरीक्षक संजय पवार यांनी दिली. विविध रस्त्याच्या कडेला दुतर्फा ट्रेलर्स उभे केले आहेत. जेएनपीए परिसरातील विविध रस्त्यांवर दोन हजारांहून अधिक कंटेनर उभे असल्याचे न्हावा-शेवा बंदर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी सांगितले.

रेती-खडी वाहतूक बंद
वाहनचालकांच्या आंदोलनामुळे रेती, माती आणि इतर वाहतूक बंद असल्याने बांधकाम व्यवसायही अडचणीत आला आहे.

चर्चा करून मार्ग काढा
बंदरात मालवाहतूक करणाऱ्या वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याची सूचना केल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी दिली.

नियंत्रण कक्ष स्थापन करा, मुख्यालय सोडू नका 
मुंबई : वाहतूकदारांच्या बंदमुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करा, मुख्यालय सोडू नका, असे आदेश अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले. 

Web Title: 75,000 trailers stuck at JNPA, import-export at the port stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.