पनवेल तालुक्यात ७७ अतिक्रमणे
By admin | Published: November 22, 2015 12:25 AM2015-11-22T00:25:37+5:302015-11-22T00:25:37+5:30
तालुक्यातील बेकायदेशीर बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तालुक्याचा झपाट्याने विकास होत असल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम
पनवेल : तालुक्यातील बेकायदेशीर बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तालुक्याचा झपाट्याने विकास होत असल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिक आले आहेत. दररोज नवनवीन बांधकाम व्यावसायिक उदयास येत असल्यामुळे पनवेल तसेच आजूबाजूच्या परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून फसवणुकीचे प्रकारदेखील मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत.
तहसील विभागाने तालुक्यातील ७७ अनधिकृत बांधकामे शोधून काढली आहेत. त्यामुळे लवकरच ही सर्व ७७ बांधकामे जमीनदोस्त करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्यातील २३ गावांत नैना (सिडको) प्रकल्प येणार असल्यामुळे इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नैनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सिडकोने यातील बहुतांश बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम थांबविण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसींना केराची टोपली दाखवत बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम सुरूच ठेवले आहे.
नेरे, कोप्रोली, विहिघर, चिपळे, सुकापूर, आकुर्ली, हरिग्राम, भानघर, कोळवडी, देवद, विचुंबे, आदई, शिवकर, वाजे, उमरोली, मोरबे, कामोठे आदी गावांमध्ये बांधकाम व्यावसायिक आल्यामुळे जमिनींना सोन्याचे भाव आले. अनेकांनी फिफ्टी-फिफ्टीच्या तत्त्वावर मोठ्या प्रमाणात इमारती उभारण्यास दिल्या आहेत.पनवेल शहर तसेच सिडकोच्या हद्दीत जमीन शिल्लक नसल्याने आजूबाजूच्या गावात अनधिकृत बांधकाम सुरूच आहे.मात्र यातील बहुतांशी इमारतींना केवळ ग्रामपंचायतीकडून परवानग्या घेतल्या आहेत. सांडपाणी, वाहनतळ, कचरा आदी कोणत्याही प्रकारच्या सुविधा न देता बिल्डर गावागावात मोठमोठ्या बिल्डिंग उभारत आहेत.यातील काही अनधिकृत बांधकामे माजी सरपंचांचे असल्याचे समोर आले आहे.
ठिकठिकाणी होर्डिंग आणि बॅनरबाजी करून इमारतीविषयी जाहिराती करण्यात येत आहेत. सरकारी बँकेचे लोन करून देतो, पाच मिनिटावर रेल्वेस्थानक अशा कितीतरी प्रकारच्या फसव्या जाहिराती करून लोकांना फसवले जात आहे. सामान्य लोकांनी स्वत:चे घर असावे म्हणून आपली आयुष्यभराची जमापुंजी घर घेण्यासाठी खर्च केली आहे तर काहींनी कर्ज घेऊन अनधिकृत इमारतींमध्ये घर बुक केले आहेत. मात्र त्यांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर निबंधक कार्यालयात दलालांच्या मार्फत सेटिंग लावून घरांचे रजिस्ट्रेशनही करण्यात येते. सहकारी बॅँकांच्या दलालांच्या मार्फत घरांवर लोन करून दिले जाते. लोन होत असल्याने ग्राहकही तांत्रिकदृष्ट्या जादा चौकशी करीत नाहीत, आणि येथेच ते फसतात. बहुतांशी बांधकामांना परवानगी न घेता बांधकाम केल्यामुळे सिडको ते केव्हाही पाडू शकते. या प्रकरणी काहींनी पोलीस स्टेशन व न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर तक्रारीही दाखल आहेत. (प्रतिनिधी)