नवी मुंबई : पोलीस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेचा आठ दिवसांचा पहिला टप्पा बुधवारी पार पडला. त्यामध्ये १४ हजार ३३ प्राप्त अर्जांपैकी ७ हजार ७३१ उमेदवार पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. त्यांची ९ एप्रिलपासून मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत ९० जागांसाठी होणाऱ्या पोलीस भरतीकरिता १४ हजार ३३ उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज केले होते. ४ मार्चपर्यंत त्यांना आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली होती. त्यानुसार पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुण-तरुणींनी पुरेसा प्रतिसाद दिलेला आहे. या उमेदवारांची कागदपत्रं पडताळणी व छाती, उंची मोजमाप प्रक्रिया झाली असता ७ हजार ७३१ उमेदवार पात्र ठरल्याचे उपायुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. त्यामुळे आयुक्तालयाच्या ७८ जागांसाठी ५,२०७ पुरुष व ७११ महिला मैदानात शिल्लक राहिल्या आहेत. तसेच कारागृहाच्या १२ जागांसाठी १,७२२ पुरुष व १९१ महिला उमेदवार पुढील प्रक्रियेत दाखल झाले आहेत.पोलीस आयुक्तालयाच्या ७८ जागा व तळोजा कारागृहाच्या १२ जागा अशा एकूण ९० रिक्त जागांसाठी ही पोलीस भरती होत आहे. त्यानुसार अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची कागदपत्रं, छाती व उंची पडताळणी गेली आठ दिवस कळंबोली येथे सुरू होती. याकरिता राज्याच्या विविध भागांतील तरुणांनी शहराकडे धाव घेतली होती. तर काही उमेदवार विविध कारणांमुळे अर्ज करूनही भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याच्या पडताळणीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु मोठ्या जिद्दीने भरती प्रक्रियेत उतरलेल्यांपैकी प्रतिदिन सुमारे दीड ते दोन हजार उमेदवारांची कागदपत्रं पडताळणी करण्यात आली. गेले आठ दिवस सुरू असलेली ही प्रक्रिया बुधवारी संध्याकाळी पूर्ण झाली. त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी ९ एप्रिलपासून खारघर व कळंबोली येथे होणार असून त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. याकरिता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून उमेदवारांची पुरेशी खबरदारी घेण्यासह भरती प्रक्रिया पारदर्शक राबवण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्यालय उपायुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पोलीस भरतीसाठी ७,७३१ उमेदवार पात्र
By admin | Published: April 07, 2016 1:27 AM