वाशीत दोन दिवसांत हटवल्या ७७६ झोपड्या; महानगरपालिकेची धडक कारवाई
By नामदेव मोरे | Published: May 28, 2024 07:26 PM2024-05-28T19:26:44+5:302024-05-28T19:27:00+5:30
खाडीकिनाऱ्यासह उद्यानाचा भूखंड अतिक्रमणमुक्त
नवी मुंबई - मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. वाशीगाव परिसरातील खाडीकिनारा ते महामार्गादरम्यानचे उद्यान व इतर भूखंडांवरील झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत ७७६ झोपड्या हटविण्यात आल्या. या कारवाईदरम्यान कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नवी मुंबईमध्ये सिडको, एमआयडीसी व शासनाच्या माेकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्यांचे बांधकाम केले जात आहे. कोट्यवधी रुपयांचे भूखंड झोपड्या उभारून हडप केले जात आहेत. वाशीगाव सेक्टर ३१ परिसरात रेल्वे स्टेशन, सिडको प्रदर्शन केंद्र, देशभरातील अनेक राज्यांचे भवन, आयटी पार्क, मॉल्स असल्यामुळे या परिसरातील भूखंडांना शहरात सर्वाधिक भाव मिळतो. परंतु, मागील काही वर्षांमध्ये या परिसरातील मोकळ्या भूखंडावर सातत्याने झोपड्या उभारल्या जात आहेत. उद्यानासाठी राखीव असलेला भूखंड, खाडीकिनारा ते सायन - पनवेल महामार्गाच्या मध्ये असलेले मोक्याच्या भूखंडांवर शेकडो झोपड्या उभारण्यात आल्या. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने या झोपड्यांवर कारवाई करीत सोमवारी दिवसभरात तब्बल ६३८ व मंगळवारी १३८ झोपड्या हटविल्या.
या वर्षातील अनधिकृत झोपड्यांवरील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. जेसीबी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनधिकृत झोपड्यांविरोधातील ही कारवाई सुरूच ठेवली जाणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
बेलापूरमध्ये १९३ झोपड्या हटविल्या
मागील काही दिवसांपासून अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरू केली आहे. आठ दिवसांमध्ये बेलापूरमध्ये दोन वेळा कारवाई केली. पहिल्या दिवशी १४५ व दुसऱ्या कारवाईमध्ये ४८ अशा एकूण १९३ झोपड्या हटविण्यात आल्या आहेत.