भाजपाचे ७८ पैकी ६९ मराठी, नऊ अमराठी उमेदवार
By admin | Published: May 11, 2017 02:15 AM2017-05-11T02:15:36+5:302017-05-11T02:15:36+5:30
पनवेल महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देत भाजपाने ७८ पैकी ६९ जागांवर मराठी उमेदवारांना
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देत भाजपाने ७८ पैकी ६९ जागांवर मराठी उमेदवारांना प्राधान्य देतानाच नऊ अमराठी उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. दरम्यान, पनवेल महापालिकेचा पहिला महापौर भाजपाचाच होणार असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाताना शिवसेनेकडून युतीबाबत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने भाजपाने रिपाइं आठवले गटाला सोबत घेत स्वबळ आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना प्रशांत ठाकूर म्हणाले की, पहिल्या महापालिकेवर भाजपाचेच वर्चस्व राहणार असून पहिला महापौरही भाजपाचाच असेल याबद्दल विश्वास असल्याचेही ते म्हणाले. केंद्रात व राज्यात सोबत असलेल्या मित्र पक्षांना सत्तेतील योग्य वाटा देण्याचे पक्षाचे धोरण राहिले आहे. त्याच धर्तीवर पनवेलमध्येही योग्य तो वाटा मित्र पक्षांना दिला जाईल, असेही ते म्हणाले.