CoronaVirus: नवी मुंबईतील 78 हजार जणांनी कोरोनाला हरविले; ८९३९ ज्येष्ठ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 11:01 PM2021-04-24T23:01:30+5:302021-04-24T23:01:39+5:30
८९३९ ज्येष्ठ कोरोनामुक्त : नव्वदीच्या पुढील ६६ जणांचा समावेश
नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या नवी मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. आतापर्यंत तब्बल ७८ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यामध्ये ८९३९ ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ९० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ६६ जणांनी कोरोनाला हरविले आहे.
नवी मुंबईमध्ये सलग दहा दिवस रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. कोरोनाचा धोका टळला नसला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत तब्बल ७८०९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्क्यांवर पोहोचले आहे.
विशेष म्हणले ज्येष्ठ नागरिकांमध्येही कोरोमुक्तीचा टक्का वाढू लागला आहे. ९० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ९४ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तब्बल ६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ८९३९ जण बरे झाले आहेत. वेळेत चाचणी केली व उपचार सुरू केले, तर आजारातून बरे होता येते. नागरिकांनी चाचणीसाठी विलंब करू नये. कोरोनाला घाबरू नये. नियमांचे पालन करावे व डॉक्टरांच्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
कोरोनाचा धोका वाढत असल्याने शासनाने दिसेल्या त्रिसुत्रींचे पालन करण्याकडे नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.