बाजार समितीमधील व्यापाºयाची ७९ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:30 AM2017-08-11T06:30:45+5:302017-08-11T06:30:45+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाºयाकडून १०० टन डाळ खरेदी करून पैसे न दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. तब्बल ७९ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाºयाकडून १०० टन डाळ खरेदी करून पैसे न दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. तब्बल ७९ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एपीएमसीजवळील ग्रोमा हाउस इमारतीमधील प्रफुल्लचंद वसनजी आणि कंपनीमध्ये नोकरी करणाºया भावेश मडीयार यांनी याविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. कंपनी डाळी व कडधान्याची आयात-निर्यात करण्याचा व्यवसाय करत आहे. कंपनीने मागविलेला माल कमिशन घेवून इतरांना विकण्याची जबाबदारी मडीयार यांच्यावर आहे. मार्केटच्या नियमाप्रमाणे कोणत्याही पार्टीला माल विक्री केल्यानंतर ३० दिवसांमध्ये आरटीजीएसद्वारे कंपनीच्या खात्यावर जमा करणे आवश्यक असते. २०१३ मध्ये त्यांची ओळख हैदराबादमधील स्वस्तिक कार्पोरेशनचे मालक व डाळीचे एजंट शिवराज पाटील, संतोष पाटील यांच्यासोबत झाली होती. त्यांच्यासोबत व्यवसाय सुरू केला. डाळींची विक्री झाल्यानंतर दहा दिवसांमध्ये ते आरटीजीएसद्वारे पैसे देत होते. २०१५ मध्ये शिवराज पाटील यांनी १०० टन मसूर डाळ खरेदीची आॅर्डर दिली होती. मडीयार यांनी प्रफुलचंद वासनजी यांच्यामार्फत ईटीसी अगारे प्रोसेसिंग कंपनीच्या माध्यमातून डाळ खरेदी केली व संतोष व शिवराज पाटील यांच्या सांगण्यावरून तो संगमेश्वर ट्रेडर्स मार्केट यार्ड औरद, लातूर यांना पाठविली.
डाळ दिल्यानंतर नियमाप्रमाणे संंबंधितांनी ३० दिवसांमध्ये पैसे जमा करणे आवश्यक होते. परंतु एक महिन्यापेक्षा जास्त दिवस झाल्यानंतरही पैसे दिले नाहीत. यामुळे संगमेश्वर ट्रेडर्सचे मालक दिनेश पाटील यांच्यासोबत संपर्क केला. परंतु त्यांनी प्रफुल्लचंद्र वसनजी यांच्याकडून कोणताही माल आला नसल्याचे स्पष्ट केले. शिवराज यांच्याशी संपर्क केल्यानंतर पैशासाठी संगमेश्वर ट्रेडर्सला फोन करण्यास सांगितले. त्यांच्याविषयी संशय आल्याने त्यांनी विरू रोडलाईन्सकडे चौकशी केली. त्यांनी शिवराज यांनी माल लातूर ऐवजी हैदराबादला पाठविण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. यामुळे संंबंधित व्यक्ती फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाल्याने मडीयार यांनी तक्रार केली असून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.