अनधिकृत बांधकामप्रकरणी वर्षभरात १५१ जणांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 01:26 AM2020-01-08T01:26:12+5:302020-01-08T01:26:20+5:30
पालिकेच्या परवानगी विनाबांधकाम केल्याप्रकरणी गतवर्षात १५१ जणांविरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नवी मुंबई : पालिकेच्या परवानगी विनाबांधकाम केल्याप्रकरणी गतवर्षात १५१ जणांविरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये रबाळे पोलीसठाण्यात सर्वाधिक ८० गुन्हे दाखल आहेत. मात्र, शहरात अद्यापही शेकडोच्या संख्येने अतिक्रमणे सुरू असतानाही त्यावर कारवाईकडे होत असलेल्या दुर्लक्षावरून कारवाईच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शहरातील वाढती अनधिकृत बांधकामे नागरी सुविधांवर परिणामकारक ठरत आहेत. त्यामुळे दिघा येथील प्रकरणानंतर अनधिकृत बांधकांवर काही प्रमाणात प्रशासनाकडून कारवाईला गती देण्यात आली आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सन २०१९ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) अंतर्गत १५१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ८० गुन्हे रबाळे पोलीसठाणे अंतर्गतचे असून वाशी, तुर्भे व रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकाही गुन्ह्याची नोंद नाही. तर सानपाडा व सीबीडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद आहे; परंतु शहरात प्रत्यक्षातील अतिक्रमणे व दाखल गुन्हे यात प्रचंड तफावत असल्याची खंत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
अवैध बांधकामांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी विनापरवाना बांधकाम सुरू असतानाच संबंधितावर गुन्हे दाखल करून बांधकाम पाडले जाणे आवश्यक आहे. यानंतरही अनेकदा बांधकाम पूर्ण होईपर्यंत स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचा रहिवासी वापर सुरू करून त्यावरील कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याची संधीही दिली जात असल्याचा आरोप होत आहे. तर बहुतांश ठिकाणी बांधकाम पाडल्यानंतरही त्या ठिकाणी इमारती उभ्या असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामागे अर्थपूर्ण हितसंबंधांसह राजकीय वरदहस्त वापरला जात असल्याचाही आरोप होत आहे. अशा अनधिकृत बांधकामांचा परिणाम तिथल्या मूलभूत सुविधांवर उमटून स्थानिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
अनेक ठिकाणी उद्यानाच्या भिंतीवरच घरांच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. तर रेल्वे रुळालगतच्या मोकळ्या जागा, सिडकोचे भूखंड हडपून त्या ठिकाणी इमारतींसह चायनिस सेंटर उभारण्यात आले आहेत. काही इमारतींच्या तळमजल्याची जागा बंदिस्त करून त्या ठिकाणी बार व हॉटेल चालवले जात आहेत. घणसोली, कोपरखैरणे, वाशी तसेच सानपाडा परिसरात अशी बांधकामे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकापेक्षा अधिक वेळा कारवाई करूनही जी बांधकामे सातत्याने उभारली जात आहेत, त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करून त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांचाही समावेश करण्याचीही मागणी होत आहे.
>एमआरटीपी अंतर्गत दाखल गुन्ह्यांची संख्या
पोलीस ठाणे गुन्हे
रबाळे ८०
कोपरखैरणे ५५
एनआरआय ०८
नेरुळ ०४
एपीएमसी ०२
सानपाडा ०१
सीबीडी ०१
रबाळे एमआयडीसी ००
तुर्भे ००
वाशी ००
एकूण १५१