८०० कोटींची जमीन झाली अतिक्रमणमुक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2016 02:43 AM2016-02-04T02:43:34+5:302016-02-04T02:43:34+5:30
सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात कंबर कसली आहे. याअंतर्गत मागील दीड वर्षात जवळपास ९५ हजार चौरस मीटर जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे
कमलाकर कांबळे, नवी मुंबई
सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात कंबर कसली आहे. याअंतर्गत मागील दीड वर्षात जवळपास ९५ हजार चौरस मीटर जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या जागेची किंमत ८०० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे सिडकोचे मनोबल उंचावले असून, येत्या काळात अतिक्रमणांच्या विरोधातील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबईतील बहुतांशी जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षांत सिडकोच्या दुर्लक्षपणामुळे या जमिनी भूमाफियांनी गिळंकृत केल्या आहेत. सिडकोच्या या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. मागील दीड दशकात या अतिक्रमणांना आळा घालण्यात सिडको सपशेल अपयशी ठरली आहे. असे असले तरी गेल्या दीड-दोन वर्षांपासून सिडकोने अतिक्रमणांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षात तर ही मोहीम अधिक व्यापक करण्यात आली. त्यामुळे जून २0१५ नंतर आतापर्यंत नवी मुंबईसह उरण आणि पनवेल तालुक्यातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करून तब्बल ६४ हजार २0७ चौरस मीटर म्हणजेच १६ एकर जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली. त्याअगोदर म्हणजेच २0१४ मध्ये एकूण ३१ हजार ३४५ चौरस मीटर जागेवरील अतिक्रमण हटवून ती ताब्यात घेतली आहे. सध्याच्या मार्केट दरानुसार या संपूर्ण जागेची किंमत ८०० कोटी रुपयांच्या घरात आहे. सिडकोच्या मालकीच्या आणखी शेकडो एकर जमिनीवर बेकायदा बांधकामे उभारली आहेत. टप्प्याटप्प्याने ही सर्व बांधकामे जमीनदोस्त करून अतिक्रमित जागा ताब्यात घेण्याची योजना सिडकोने आखली आहे. त्यामुळे येत्या काळात ही मोहीम तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.