नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने प्लास्टीकचा वापर करणारांविरोधात मोहीम सुरु केली आहे. बेलापूर विभाग कार्यालयाच्या माध्यमातून करावे गावात धाड टाकून ८०० किलो प्लास्टीकचा साठा जप्त केला आहे. सदर दुकानदारावर दोनवेळा कारवाई असून त्याच्याकडून २५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. गोडाऊनही सील केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने प्लास्टीक विरोधात जोरदार मोहीम सुरु केली आहे. प्लास्टीकचा साठा व वापर करणारांविरोधात नियमीत कारवाई केली जात आहे. सीवूड विभागात एक महिला प्रतिदिन स्कूटीवरून येऊन फेरीवाल्यांना प्लास्टीक पिशव्यांचा पुरवठा करत असल्याची माहिती बेलापूर विभाग कार्यालयास मिळाली होती. विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त डॉ. मिताली संचेती यांच्या नियंत्रणाखाली पथकाने या महिलेला प्लास्टीक पिशव्यांची विक्री करत असताना पकडण्यात आले.
तीच्याकडून ३० किलो प्लास्टीक जप्त केले व ५ हजार रुपये दंड वसूल केला. करावे गावातील महावीर ट्रेडर्स दुकानावर धाड टाकून गोडाऊनमधून सिंगल युज प्लास्टीक, चमचे, गार्बेज पिशव्या अशा एकूण ८०० किलो प्लास्टीकचा साठा जप्त करण्यात आला. या दुकानदारावर यापुर्वी दोन वेळा कारवाई केली आहे. तिसऱ्यांदा कारवाई करताना २५ हजार रुपये दंड वसूल केला असून संबंधीतावर गुन्हाही दाखल केला आहे. प्लास्टीकचा वापर करणारांविरोधात आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरुच राहणार असल्याचे विभाग अधिकारी डॉ. मिताली संचेती यांनी स्पष्ट केले आहे