मधुकर ठाकूर/ उरण :उरण येथे १०० खाटांचे श्रेणीवर्धीत उपजिल्हा रुग्णालय तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मागील १५ वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या या प्रलंबित कामासाठी ८२. ५४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
उद्योग, वाहतूक, आणि लोकसंख्येचा विचार करता दिवसेंदिवस उरण परिसराचा झपाट्याने विकास होत असताना येथे आरोग्य सुविधांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे उरणमध्ये सर्वसुविधांयुक्त असे १०० खाटांचे शासकीय उपजिल्हा रुग्णालय आणि त्या अनुषंगाने सुविधा देण्याची मागणी उरणकरांनी उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली होती.यासाठी सिडकोने बोकडवीरा गावाजवळ सहा हजार चौ.मी. क्षेत्राचा भुखंड दिला आहे.या जागेवर तत्कालीन आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्या यांनी पाहणीही केली होती.त्यानंतर मात्र १०० खाटांचे शासकीय उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामासाठी निधी मिळाला नाही नसल्याने काम रखडले आहे.
यासाठी उरण सामाजिक संस्था आणि आमदार महेश बालदी यांनी सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा केला.शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका झाल्यानंतर हा प्रलंबित प्रश्न सुटण्याच्या कामाला वेग आला. त्यानंतर आता उपजिल्हा रुग्णालय व अधिकारी , कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल बांधण्यासाठी खर्च करण्यात येणाऱ्या ८४.५४ कोटी निधीला शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे .तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना या अद्यावत १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याचा मोठा फायदा उरण परिसरातील हजारो गरिबी,गरजू रुग्णांना फायदा होणार असून उरणकरांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.