नवी मुंबई: पनवेल येथील ८३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तोंडातील एका दाताची कवळी नकळतपणे गिळली आणि ती त्याच्या अन्न नलिकेमध्ये अडकली. त्यामुळे रुग्णाला घशामध्ये तीव्र वेदना होत होत्या. तसेच द्रव पदार्थदेखील गिळणे शक्य नव्हते. नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टोरोलॉजी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी एन्डोस्कोपीद्वारा ही कवळी बाहेर काढल्याने रुग्णाचे प्राण वाचले. तसेच कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न केल्यामुळे संभाव्य धोकेही टाळणे शक्य झाले.
पनवेल येथील रमेश सावंत (नाव बदलले आहे) यांनी सकाळी अचानकपणे तोंडातील एका दाताची कवळी गिळली. ही कवळी थोडी काढता येण्यासारखी होती आणि थोडी सैल झाली होती. या घटनेनंतर उपचारासाठी रमेश लगेचच जवळच्या दवाखान्यामध्ये गेले. परंतु मधुमेह, मूत्रपिंड असे दीर्घकालीन आजारांमुळे अधिक जोखीम असल्यामुळे त्यांना उपचार मिळाले नाहीत. अखेर त्या दिवशी संध्याकाळी ते नवी मुंबईतील खारघरच्या मेडिकव्हर रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टोरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. दीपक कुमार गुप्ता, कन्स्लटंट गॅस्ट्रोएन्टोरॉजिस्ट डॉ. अमित घरत आणि डॉ. अमेय सोनावणे यांच्या टीमने लगेचच रुग्णाच्या तपासण्या करून कवळी काढण्यासाठी एन्डोस्कोपी करण्याचे ठरविले.
कवळी धारदार आणि आकाराने मोठी असल्यामुळे रुग्णाच्या अन्न नलिकेत अडकल्याचे एन्डोस्कोपीत आढळले. धारदार कवळीमुळे अन्न नलिकेमध्ये रक्तस्राव सुरू झाला होता आणि रुग्ण रक्त पातळ होण्याच्या औषधांवर असल्यामुळे अन्ननलिकेतून कवळी काढणे अधिक आव्हानात्मक होते. त्यामुळे मग कवळी काळजीपूर्वक पोटामध्ये ढकलून तेथून काढण्याची युक्ती लढविली. पोटामध्ये देखील अधिक दुखापत आणि रक्तस्राव होऊ नये यासाठी कवळीचा आकार सरळ रेषेत केला, अशी माहिती नवी मुंबईच्या मेडिकव्हर रुग्णालयाचे कन्स्लटंट गॅस्ट्रोएन्टोरॉजिस्ट डॉ. अमेय सोनावणे यांनी दिली.
दरम्यान, आम्ही पनवेलमध्ये अनेक डॉक्टरांकडे गेलो. परंतु मूत्रपिंडासह असलेले इतर आजार, हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांच्यावर उपचार करणे डॉक्टरांना जोखमीचे वाटत होते. अखेर आम्ही या रुग्णालयात आलो आणि दोन तासांमध्ये प्रगत उपचार मिळाले. मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने आणि कोणतीही शस्त्रक्रिया न करता उपचार केल्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. आता माझ्या वडिलाची प्रकृती स्थिर असून ते खाणेपिणे ही सहजपणे करता येत असल्याचे रुग्णाचा मुलगा राघव सावंत(नाव बदलले आहे) यांनी व्यक्त केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"