नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ८३८ मतदान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:38 AM2019-04-25T00:38:47+5:302019-04-25T00:39:05+5:30

प्रशासनाची जय्यत तयारी; दिव्यांग नागरिकांसाठी १२ सुविधा कक्ष

838 polling stations in Navi Mumbai Municipal Corporation area | नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ८३८ मतदान केंद्रे

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ८३८ मतदान केंद्रे

Next

नवी मुंबई : निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात १२७ इमारतींमध्ये तब्बल ८३८ मतदान केंद्रे असून प्रत्येक ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग नागरिकांसाठी १२ ठिकाणी सुविधा कक्ष निर्माण करणार असून दिव्यांग मित्र नावाने समन्वयकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक गोष्टीचा नियमित आढावाही घेतला जात आहे. ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये ७२ इमारतींमध्ये ४५२ मतदान केंद्रे असून अभय करगुटकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. बेलापूर मतदारसंघामध्ये ५५ इमारतींमध्ये ३८६ मतदान केंद्रे असून रूपाली भालके सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. शहरामध्ये ५३७ दिव्यांग मतदार आहेत. त्या सर्वांना विनाअडथळा मतदान करता यावे यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावर व्हिलचेअर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ज्या ठिकाणी पहिल्या मजल्यावर मतदान केंद्रे आहेत; परंतु तेथे लिफ्टची सुविधा नाही अशा इमारतींमध्ये डोलीची व ती उचलण्यासाठी स्वयंसेवकांची सोय केली आहे. दिव्यांग व्यक्तींच्या सुविधेकरिता विशेष कक्ष स्थापित करण्यात येणार असून कोपरखैरणे,घणसोली, ऐरोली, दिघा, तुर्भे, बेलापूर, नेरूळ व वाशी विभाग कार्यालय परिसरामध्ये रिक्षांचीही सोय केली आहे. शहरामध्ये १२ सुविधा कक्ष असून तेथे दिव्यांग मित्र योजना राबविली जात आहे. प्रत्येक ठिकाणी समन्वयकाची नियुक्ती केली आहे. दिव्यांग मित्र त्यांच्या क्षेत्रामधील मतदारांशी संपर्क साधून त्यांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी व पुन्हा घरी सोडण्यासाठीची व्यवस्था आहे.

दिव्यांगांप्रमाणे लहान मुले असणाऱ्या महिलांनाही सुलभपणे मतदान करता यावे याकरिता मतदान केंद्र असलेल्या सर्व इमारतींमध्ये बालसंगोपन केंद्र स्वरूपातील पाळणाघर स्थापित करण्यात येणार आहेत. त्यासाठी बालवाडी शिक्षिका व लिंकवर्कर यांची मदत घेतली जाणार आहे. महापालिकेच्यावतीने उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्या नियंत्रणाखाली ऐरोलीसाठी संध्या अंबादे व बेलापूरसाठी चंद्रकांत तायडे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

सखी मतदान केंद्र
शहरामधील एका मतदान केंद्रावर पूर्णपणे महिला अधिकारी कार्यरत असणार आहेत. या सखी मतदान केंद्रामध्ये केंद्र अध्यक्षापासून शिपाईपर्यंत सर्व कामकाज महिला सांभाळणार आहेत. याशिवाय दोन्ही मतदारसंघामध्ये दोन ठिकाणी आदर्श केंद्रे स्थापित केली जाणार असून तेथे रांगोळी काढली जाणार असणार असून मतदारांचे विशेष स्वागत केले जाणार आहे.

Web Title: 838 polling stations in Navi Mumbai Municipal Corporation area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.