विकासगडावर ८४ कोटींच्या महसुलाचे ओझे
By admin | Published: January 6, 2016 01:12 AM2016-01-06T01:12:20+5:302016-01-06T01:12:20+5:30
रायगड जिल्ह्याला २१२ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने होणारी डेव्हलपमेंट विचारात घेता रायगड हा विकासगड
आविष्कार देसाई , अलिबाग
रायगड जिल्ह्याला २१२ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने होणारी डेव्हलपमेंट विचारात घेता रायगड हा विकासगड म्हणून नावारूपाला येत आहे. त्यामुळे ८४ कोटी रुपयांच्या जादा महसुलाचे ओझे जिल्हा प्रशासनावर टाकण्यात आल्याचे बोलले जाते. आतापर्यंत सुमारे ५० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. उर्वरित उद्दिष्ट तीन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.
जिल्ह्यामध्ये पनवेल, उरण, कर्जत, खालापूर आणि अलिबाग या तालुक्यांत हजारो कोटी रुपयांची विकासकामे वेगाने सुरू आहेत. महसूल गोळा करण्यासाठी या तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. खनिकर्म, करमणूक, दंडात्मक कारवाई यासह अन्य मार्गाने महसूलवाढीचे प्रयत्न केले जात आहेत. नोव्हेंबर २०१५ अखेर जिल्ह्याने सुमारे ३५.५० टक्केच महसूल गोळा केल्याने महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी यांना २ जानेवरीच्या पत्रान्वये नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. जिल्ह्याला २०१४-१५ साठी सुमारे १२८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. ते पूर्ण करण्यात प्रशासनाने कसलीच कसर ठेवली नाही. नैसर्गिक वाढ गृहीत न धरता मागील लक्षांकापेक्षा ८४ कोटी रुपयांचा अधिक म्हणजे २१२ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे ओझे सरकारने जिल्हा प्रशासनावर टाकले आहे.
१कर्जत : तालुक्यातील महसूल विभागाने बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्यांविरु द्ध दंड थोपटले आहेत. दोन दिवसांत तीन ठिकाणी धाडी टाकून बेकायदा उत्खनन करून ठेवलेली रेती जप्त करण्यात आली. तर संबंधितांकडून तब्बल ८० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.२कर्जतचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी अनधिकृत आणि बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्यांविरु द्ध जोरदार मोहीम उघडली आहे. नेरळजवळ उल्हास नदीमध्ये रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती दामत येथील तलाठी शिंदे यांना मिळाली. ३तहसीलदार बाविस्कर यांना माहिती सांगताच तहसीलदार, तसेच मंडल कार्यालयातील अव्वल कारकून किरण पाटील यांनी तत्काळ उल्हास नदी गाठली. तेथे नदीच्या पलिकडे रेती उत्खनन जेसीबी मशिन लावून सुरू होते. परंतु तहसीलदारांची गाडी बघताच जेसीबीचालक मशिन घेऊन नदीच्या पलीकडे निघून गेले. मात्र तेथे रेती काढणाऱ्यांकडून दोन ब्रास रेती काढलेली दिसून आली.त्याबद्दल २७ हजार रु पये दंड लावण्यात आला.
४ दुसरीकडे ही कारवाई सुरू असताना अचानक एक रेती भरलेला डंपर (एमएच ०४ एफपी १४१३) तहसीलदार आणि तलाठी यांनी थांबविला. त्यात दोन ब्रास रेती आढळून आली, त्याबद्दल डंपरचालक यांच्याकडून २७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.