पनवेल शहराचा देशात ८६ वा क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 11:40 PM2019-03-06T23:40:16+5:302019-03-06T23:40:25+5:30
स्वच्छ भारत स्पर्धेत पनवेल महानगरपालिकेला देशभरातून ८६ वा क्र मांक मिळाला आहे, तर राज्यात स्वच्छतेच्या बाबतीत पनवेल शहर २५ व्या क्र मांकावर आहे.
पनवेल : स्वच्छ भारत स्पर्धेत पनवेल महानगरपालिकेला देशभरातून ८६ वा क्र मांक मिळाला आहे, तर राज्यात स्वच्छतेच्या बाबतीत पनवेल शहर २५ व्या क्र मांकावर आहे. मागील वर्षी पनवेल शहर देशभरात ८७ क्र मांकावर होते. यावर्षी पालिकेची वाटचाल एक क्र मांकाने पुढे आली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत देशभरातील ४२३७ शहरे सहभागी झाली होती. पनवेल महानगरपालिकेची स्थापना नुकतीच दोन वर्षांपूर्वी झाली आहे. बाल्यावस्थेत असलेल्या पनवेल महानगरपालिकेसमोर प्रशासनाची घडी बसवणे, सिडको नोड हस्तांतर आदीसह ग्रामीण भागाला शहरांच्या तुलनेत मुख्य प्रवाहात आणणे हे प्रश्न आहेत. मागील वर्षीदेखील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पनवेल महानगरपालिकेने भाग घेतला होता. मात्र, त्या वेळी केवळ ३० हेक्टर चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यावर्षी संपूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या एकूण ११० हेक्टर चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे सर्वेक्षण करण्यात आल्याने पनवेल महानगरपालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत काही प्रमाणात सुधारणा केल्याचे दिसून येत आहे. कचरा व्यवस्थापनही यावर्षी पनवेल महानगरपालिकेच्या ताब्यात आले आहे. मागील वर्षी ते सिडको प्रशासनाकडे होते.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एमआयडीसी, एपीएमसी मार्केट, स्टील मार्केट, ग्रामीण भागाचा सहभाग आहे. स्वच्छतेच्या बाबतीत ग्रामीण भाग अद्याप मागासलेला आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत पालिकेने भित्तिचित्रे, कचरा व्यवस्थापन आदीवर काम केल्याने स्वच्छतेच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकले असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.
>स्वच्छ सर्वेक्षणात आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मागील वर्षी केवळ ३० हेक्टर चौरस किलोमीटरमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाची पाहणी झाली होती. यावर्षी संपूर्ण पालिका क्षेत्राचा सर्व्हे झाला, तरीदेखील मागील वर्षीच्या तुलनेने एक पाऊल पुढे टाकले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत भविष्यात नक्कीच सुधारणा होतील.
- गणेश देशमुख,
आयुक्त,
पनवेल महापालिका