नवी मुंबई : पामबीच रोड व खाडीच्या पट्ट्यात करावे ग्रामस्थांची ८७ एकर जमीन पडून आहे. शासनाने सदर जमीन रिजनल पार्कसाठी राखीव ठेवली आहे. परंतु याच परिसरात एनआरआय कॉम्प्लेक्स व अधिकाऱ्यांसाठीचे टॉवर उभे राहिले आहेत. याच धर्तीवर प्रकल्पग्रस्तांना घरे बांधण्यास परवानगी देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. नवी मुंबई वसविण्यासाठी शासनाने येथील प्रकल्पग्रस्तांची शंभर टक्के जमीन संपादित केली आहे. यासाठी अत्यंत अल्प मोबदला देण्यात आला. मनपा क्षेत्रामधील फक्त करावे ग्रामस्थांची ८७ एकर जमीन संपादित केलेली नाही. परंतु ही जमीन रिजनल पार्कसाठी आरक्षित आहे. नवीन पक्षी अभयारण्यही याच जमिनीवर होणार आहे. या परिसरामध्ये खाडीला लागून सिडकोची एनआरआय वसाहत आहे. याशिवाय राज्यातील सनदी अधिकाऱ्यांसाठीही इमारती, डीपीएस स्कूल व चाणक्य अॅकॅडमीही याच परिसरात आहे. या सर्वांना बांधकाम परवानगी देताना रिजन पार्क व सीआरझेडचा नियम कुठे होता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. करावे गावातील चंद्रकांत तांडेल यांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या जमिनीचा वापर करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. याशिवाय शिवसेना विभाग प्रमुख सुमित्र कडू यांनी या परिसरात काही बिल्डरांनी शेतकरी असल्याचे खोटे पुरावे देवून जमीन खरेदी केल्याचे प्रकरणाचा अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला आहे. सर्व ग्रामस्थांच्या हितासाठी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव मांडला आहे. (प्रतिनिधी)
करावेतील ८७ एकर जागा पडून
By admin | Published: January 20, 2016 2:13 AM