नवी मुंबई - कर्जत येथील ८७ वर्षीय सोनाबाई सावंत वृद्ध आजी आपल्या यकृताचा एमआरआय अहवाल घेऊन नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलला आली. तिच्या यकृताच्या डाव्या भागामध्ये खरबूजाच्या आकाराचा ट्यूमर असल्याचे निदान झाले. नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटल्समधील डॉक्टरांच्या टीमने वेळेवर हिपॅटेक्टॉमी करून तिला नवे जीवनदान दिले. तिच्या यकृतातील मोठ्या आकाराच्या ट्यूमरमुळे तिचे पोट दाबले जात होते ज्यामुळे ती खाऊ शकत नव्हती. तिला एकच किडनी होती आणि ती अंगानेही बरीच बारीक होती व उच्च रक्तदाबामुळे तिची तब्येत अधिक गंभीर झाली होती आणि शस्त्रक्रिया करण्यासंबंधी धोका देखील जास्त होता.
डॉ. शैलेश साबळे, प्रमुख-प्रत्यारोपण शल्यविशारद, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले, “सोनाबाई सावंतच्या कुटुंबाला तिच्या तब्येतीची काळजी होती आणि तब्येत सुधारावी अशी खूप इच्छा होती, पण तिचे वाढलेले वय आणि सह-व्याधी यांची मर्यादा त्यांच्या लक्षात येत नव्हती. तिला विकार होण्याचा आणि मृत्यू येण्याचा धोका अधिक होता. तरीही, तिच्या कुटुंबाला ट्यूमरपासून मुक्ती मिळवायची होती कारण ट्यूमरमुळे तिच्या जीवनशैलीवर लक्षणीय परिणाम होत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर मी नाखुशीनेच तिला ट्यूमर मूल्यांकन आणि फिटनेस चाचण्या करायला सांगितल्या आणि महत्वाचे म्हणजे या सर्व चाचण्यांमध्ये ती उत्तीर्ण ठरली."
शस्त्रक्रियेदरम्यान बऱ्याचदा पुनरावृत्ती करावी लागली असली तरी तिने आमच्या टीमला चांगला प्रतिसाद दिला आणि शस्त्रक्रियेदरम्यान कोणतीच आव्हाने आली नाही व शस्त्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. या वैद्यकीय टीममध्ये एचपीबी आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे सल्लागार डॉ. शैलेश साबळे, एचपीबी आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे सल्लागार डॉ. केतुल शाह, सर्जिकल ऑन्कोलॉजीचे वैद्यकीय सहकारी डॉ. मकरंद कर्पे, सर्जिकल ऑन्कोलॉजीचे वैद्यकीय सहकारी डॉ. दीप माश्रू, ऍनेस्थेटिस्ट डॉ. अंबरीन सावंत, ऍनेस्थेटिस्ट डॉ. पिंकी, क्रिटिकल केअर विशेषज्ञ सल्लागार डॉ. गुणाधर पाधी, क्रिटिकल केअर विशेषज्ञ सल्लागार डॉ. सुवादीप सेन आणि परिचारिका व फिजिओथेरपी कर्मचारी यांचा समावेश होता. तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते आणि शस्त्रक्रियेनंतरच्या दुसऱ्या दिवशी ती तिच्या पायावर उभी राहिली. संतोष मराठे, मुख्य कार्यकारी अधिकारी - प्रादेशिक, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले, "सोनाबाई सावंत या वृद्ध महिलेकडून खूप काही शिकायला मिळाले. तिने हे सिद्ध केले की वय ही केवळ एक संख्या असते आणि सकारात्मक दृष्टीकोन आणि सक्रिय जीवनशैली तसेच एक उत्कृष्ट वैद्यकीय टीमच्या मदतीने वृद्धपकाळात देखील व्यक्ती स्वतंत्रपणे स्वेच्छेने आणि आनंदाने जगू शकते.