नामदेव मोरे, नवी मुंबईमहापालिकेने ३७ कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या वंडर्स पार्कमध्ये जगातील सात आश्चर्यांविषयी अपूर्ण व चुकीची माहिती दिली आहे. ब्राझीलमधील क्रिस्तो रेदेंतोर पुतळ्याचे बांधकाम १९२२ मध्ये सुरू होवून ते १३३१ मध्ये पूर्ण केल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून वारंवार तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये २०० उद्याने आहेत. परंतु बेलापूर ते दिघापर्यंतच्या नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी असे एकही चांगले उद्यान शहरात नव्हते. यामुळे महापालिकेने नेरूळ सेक्टर १९ ए मध्ये फेब्रुवारी २०१० मध्ये वंडर्स पार्क उद्यान उभारण्याचे काम सुरू केले. जवळपास ३७ कोटी रूपये खर्च करून हे उद्यान उभारण्यात आलेल्या उद्यानाचे लोकार्पण डिसेंबर २०१२ मध्ये करण्यात आले. तीन वर्षामध्ये ८ लाख ७४ हजार ९६४ नागरिकांनी या उद्यानास भेट दिली आहे. शहरातील सर्वात भव्य उद्यान म्हणून याचा उल्लेख होत असला तरी प्रत्यक्षात मात्र वास्तव खूप वेगळे आहे. योग्य नियोजन नसल्याने येथील विस्तीर्ण भूखंडाचा योग्य वापर करता आलेला नाही. खूप गाजावाजा करून तयार केलेले ट्रॅफिक गार्डन सुरूच झाले नाही. उद्यानामध्ये येणाऱ्या लहान मुलांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या असून त्याची माहितीही दिली आहे. परंतु ही माहिती अपूर्ण आहे. ब्राझीलमधील रियो शहरामध्ये २३०० फूट उंच डोंगरावर क्रिस्तो रेदेंतोर हा १३० फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याचे काम १९२२ मध्ये सुरू केले व १९३१ मध्ये पूर्ण करण्यात आले. परंतु वंडर्स पार्कमधील माहिती फलकामध्ये इंग्रजी माहिती बरोबर आहे. परंतु मराठी मजकुरामध्ये १३३१ मध्ये सदर बांधकाम पूर्ण झाल्याचा उल्लेख केला आहे. पालिकेच्या या चुकीमुळे भेट देणारे नागरिक नाराजी व्यक्त करू लागले आहेत. महापालिकेने ब्राझीलमधील ख्रिस्ती धर्माचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या क्रिस्तो रेदेन्तोर पुतळ्याविषयी चुकीची माहिती दिल्यामुळे नागरिकांची निराशा होवू लागली आहे. अनेक नागरिकांनी याविषयी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. परंतु मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. दक्ष नागरिकांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, २००७ मध्ये विश्वभर झालेल्या मतदानातून ही सात आश्चर्ये निवडलेली आहेत. २००७ पूर्वी पुरातन काळातील सात आश्चर्ये वेगळी होती. याशिवाय मानवनिर्मित सात आश्चर्ये वेगळी आहेत. या सर्वांची माहिती याठिकाणी उपलब्ध होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. १जगातील सात नवीन आश्चर्यांमध्ये भारतामधील ताजमहाल, मेक्सिकोमधील चिचेन इत्सा, ब्राझीलमधील क्रिस्तो रेदेंतोर, इटलीमधील कलोसियम, चीनची भिंत, पेरूमधील माक्सू पिक्त्सू व जॉर्डनमधील पेट्राचा समावेश होतो. इजिप्तमधील गिझाचा भव्य पिरॅमिडला मानाचे स्थान देण्यात आले. २ या स्पर्धेमध्ये ग्रीसमधील अथेन्स अॅक्रोपोलिस, स्पेनमधील आलांब्रा, कंबोडियामधील आंग्कोर वाट, फ्रान्समधील आयफेल टॉवर, तुर्कस्तानमधील हागिया सोफिया, जपानमधील कियोमिझू देरा, चिलीतील माऊई, जर्मनीमधील नॉयश्वानस्टाईन, रशियामधील लाल चौक, अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळा, इंग्लंडमधील स्टोनहेंज, आॅस्ट्रेलियामधील सिडनी आॅपेरा हाऊस व मालीमधील टिंबक्टूचाही समावेश होता.
वंडर्स पार्कमध्ये महापालिकेचे आठवे आश्चर्य
By admin | Published: February 05, 2016 3:00 AM