नवी मुंबई/पनवेल : पनवेल व नवी मुंबईमधून २३,७५८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २१,३७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नवी मुंबईचा ९०.५४ व पनवेलचा ८९.४ टक्के निकाल लागला आहे. दोन्ही मनपा क्षेत्रामध्ये मुलींनीच बाजी मारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाने फेब्रुवारी- मार्च २०१८ मध्ये घेतलेल्या परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये या निकालाला विशेष महत्त्व असल्याने सकाळी ११ वाजल्यापासून बोर्डाने निकाल उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर जावून निकाल पाहण्यास सुरवात केली होती. १ वाजल्यापासून प्रत्यक्ष निकाल आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आला. नवी मुंबई मनपा क्षेत्रामधून ८००९ मुले व ६५९७ मुली अशी एकूण १४६०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामधील तब्बल १२२२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९०.५४ टक्के असून यामध्ये ९३.१९ टक्के मुली व ८८.३६ टक्के मुले आहेत. पनवेलमधून ५०३५ मुले व ४११७ मुली अशा एकूण ९१५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामधील ८१४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ८९.४ टक्के आहे. पनवेलमधून ९३.२७ टक्के मुली व ८५.५८ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्याचा सर्वाधिक ९२.४७ टक्के निकाल लागला असून नवी मुंबई महापालिकेचा जिल्ह्यात तिसरा क्रमांक आहे. रायगड जिल्ह्यामध्ये तळा तालुक्याचा सर्वाधिक ९५.५७ टक्के निकाल लागला असून पनवेल तालुक्याचा चौथा क्रमांक आहे.नवी मुंबई व पनवेल परिसरामध्येही कला, वाणिज्य व विज्ञान शाखेमध्येही मुलींनीच बाजी मारली आहे. जास्त टक्के मिळविणाऱ्यांमध्येही मुलींचे प्रमाण जास्त आहे. दोन्ही मनपा क्षेत्रामध्ये २३८४ मुले नापास झाली आहेत. निकालानंतर नापास व उत्तीर्ण मुलांपैकीही गुण कमी मिळालेल्या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते. सोशल मीडियामधून उत्तीर्ण मुलांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला होता. व्हॉट्सअॅप, फेसबूकवरून गुणपत्रिका प्रसिद्ध करून शुभेच्छा दिल्या जात होत्या. राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांना घरी जावून शुभेच्छा दिल्या.सिद्धी हिंदळकरला ९५.८५ टक्के गुणवाशीतील फादर अॅग्नेल स्कूलमधील सिद्धी हिंदळकर हिने ९५.८५ टक्के गुण मिळवून महाविद्यालयामध्ये अव्वर क्रमांक मिळविला आहे. तिचे शिक्षकांसह सर्वांनी अभिनंदन केले आहे. योग्य नियोजन व मार्गदर्शनामुळे यश मिळविल्याचे तिने यावेळी सांगितले.विशेष मुलांचेही यशबारावीच्या परीक्षेमध्ये विशेष मुलांनीही यश मिळविले आहे. विनम्र अरोलकर याने ७५ व सोहम रॉय दस्तीदार याने ७४ टक्के गुण मिळविले आहेत. या दोघांचेही फादर अॅग्नेल स्कूलमधील शिक्षकांसह इतर नागरिकांनीही अभिनंदन केले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.बोर्डाच्या आवारात शुकशुकाटपूर्वी दहावी व बारावी निकालाच्या दिवशी वाशीतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांसह पालकांची प्रचंड गर्दी असायची. गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्यांचा शिक्षणमंत्री किंवा बोर्डाच्या अध्यक्षांच्या हस्ते सत्कार केला जात असे. परंतु गुणवत्ता यादी बंद केल्यापासून निकालाची उत्सुकता बंद झाली असून बोर्डाबाहेरील गर्दी जवळपास बंद झाली आहे.सोशल मीडियावरून शुभेच्छादुपारी १ वाजता निकाल जाहीर होताच काही मिनिटामध्ये व्हॉट्सअॅप व फेसबुकवर यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका पालकांनी प्रसिद्ध केल्या. यशस्वी विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. शहरातील नगरसेवक व इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनीही प्रभागांमधील यशस्वी विद्यार्थ्यांची भेट घेवून व फोन करून शुभेच्छा देण्यास सुरवात केल्याचे चित्र पहावयास मिळत होते.खचून न जाण्याचे आवाहनबारावीची परीक्षा देणारे नवी मुंबईमधील १३८१ व पनवेलमधील १००३ विद्यार्थी नापास झाले आहेत. याशिवाय अनेकांना अपेक्षेएवढे गुण मिळाले नाहीत. नापास व कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. या सर्व विद्यार्थ्यांनी खचून जावू नये, असे आवाहन शिक्षकांसह समाजातील मान्यवरांनी केले आहे.
शहरातील ९०.५४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 1:46 AM