नवी मुंबई : निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने घणसोली व दिघा येथून एकूण नऊ लाख १३ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. शनिवारी रात्री पोलिसांच्या मदतीने वाहनांची झाडाझडती घेतली जात असताना ही बेहिशोबी रोकड आढळून आली. या प्रकरणी रबाळे व रबाळे एमआयडीसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या अंतिम टप्प्याच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता निवडणूक विभागाच्या भरारी पथकासह पोलिसांकडून कंबर कसण्यात आली आहे. त्यानुसार ऐरोली विधानसभा क्षेत्रात विभागीय निवडणूक अधिकारी अभय करगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शरदचंद्र देशमुख, आनंदा सावंत व सचिन म्हसकर यांच्या पथकाकडून पोलिसांच्या मदतीने संशयित वाहनांची झाडाझडती घेतली जात आहे.
त्यानुसार शनिवारी रात्री त्यांच्या एका पथकाने घणसोली सेक्टर ६ येथे तर दुसऱ्या पथकाने दिघा येथे सापळा रचला होता. या वेळी घणसोली येथे संशयित कारच्या झडतीमध्ये दोन लाख सहा हजार रुपयांची रोकड आढळून आली. तर दिघा येथील मुकुंद चौकात एका कारमध्ये सात लाख सात हजार ५० रुपये आढळून आले. या रकमेबाबत संबंधितांकडून योग्य स्पष्टीकरण मिळू शकले नाही. त्यानुसार दोन्ही कारवार्इंमधील एकूण ९ लाख १३ हजार ५० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याची नोंद रबाळे व रबाळे एमआयडीसी पोलीसठाण्यात करण्यात आली असून, आयकर विभागामार्फत संबंधितांची चौकशी केली जाणार आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा
घणसोली येथे एका कारची तपासणी केली असता दोन लाख सहा हजार रुपयांची रोकड आढळून आली. तर दिघा येथील मुकुंद चौकात एका कारमध्ये सात लाख सात हजार ५० रुपये आढळून आले. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.