वर्षभरामध्ये ३९ टन प्लॅस्टिक जप्त; कारवाईनंतरही प्लॅस्टिकचा वापर सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 06:17 AM2019-08-22T06:17:00+5:302019-08-22T06:17:08+5:30
राज्य शासनाने प्लॅस्टिकबंदीची घोषणा केल्यानंतर महानगरपालिकेनेही शहरवासीयांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये, असे आवाहन केले.
नवी मुंबई : प्लॅस्टिक बंदीविरोधात राज्यात सर्वात प्रभावी कारवाई नवी मुंबईमध्ये सुरू आहे. वर्षभरामध्ये तब्बल ९६९ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. ३९,२१० किलो प्लॅस्टिक जप्त केले असून ४६ लाख ९९ हजार रुपये दंड वसूल केला आहे. नियमित कारवाईनंतरही दुकानदार व नागरिकांकडून प्लॅस्टिकचा वापर सुरूच आहे.
राज्य शासनाने प्लॅस्टिकबंदीची घोषणा केल्यानंतर महानगरपालिकेनेही शहरवासीयांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये, असे आवाहन केले. शहरभर जागृती करून प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबई करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. दुकानांमध्ये प्लॅस्टिकची पिशवी मिळणार नाही असे फलकही लावण्यास सांगण्यात आले. यापूर्वीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी प्लॅस्टिकमुक्त शहर करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. शासनाने निर्णय घेतल्यानंतर प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये प्लॅस्टिक जमा करण्यासाठीची सुविधाही उपलब्ध करून दिली होती. आवाहन केल्यानंतरही व्यावसायीकांकडून प्लॅस्टिकचा वापर सुरूच राहिल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेनेही छापासत्र सुरू केले. प्लॅस्टिक पिशवी विक्रीचा व्यापार करणाऱ्या होलसेल विक्रेत्यांसह किरकोळ दुकानदारांवरही कारवाई सुरू केली.
वर्षभरामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील दुकानदार, वाशीमधील व नेरूळमधील मॉल, मिठाईची दुकाने व प्लॅस्टिकचे कारखाने सर्वांवर कारवाई करण्यास सुरवात केली. आॅक्टोबर २०१८ मध्ये सर्वाधिक २० टन प्लॅस्टिक जप्त केले होते. यानंतर मार्चमध्ये १० टन प्लॅस्टिक जप्त केले. मार्चनंतर सातत्याने कारवाई सुरू आहे. महापालिकेने एक वर्षामध्ये ३१२६ दुकानांची तपासणी केली असून ९६९ ठिकाणी प्लॅस्टिकचा साठा आढळून आला आहे. वर्षभरामध्ये ४६ लाख ९९ हजार रुपये दंड वसूल केला असून जूनमध्ये सर्वाधिक १५ लाख रुपये दंड वसूल केला आहे.
महानगरपालिकेने व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईनंतरही शहरात पूर्णपणे प्लॅस्टिकचा वापर थांबलेला नाही. किरकोळ मंडई, किराणा दुकानदार व इतर अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून वापर सुरूच आहे. नागरिकांकडूनही या मोहिमेला प्रतिसाद मिळत नाही. दुकानदाराकडे प्लॅस्टिक पिशवीचा आग्रह धरला जात आहे. महापालिकेकडून कारवाईचे प्रमाण अजून वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मतही अनेक जण व्यक्त करत आहेत. प्लॅस्टिकला पर्यायी पिशव्या पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. पर्याय नसल्यामुळे प्लॅस्टिकचा वापर वाढत आहे.
प्लॅस्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुरवठादारांबरोबर किरकोळ विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई केली जावी. एकदा कारवाई केल्यानंतरही प्लॅस्टिकचा वापर होत असल्यास व्यवसाय परवाना रद्द केला तरच भविष्यात शहर प्लॅस्टिकमुक्त होऊ शकणार आहे.
पनवेलमध्येही वापर सुरूच
संपूर्ण प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेणारी पनवेल ही राज्यातील एकमेव महानगरपालिका आहे. या निर्णयाचे राज्यभर स्वागत झाले होते. यानंतर राज्य शासनानेही प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतला. नवी मुंबईमध्ये प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू असताना पनवेलमध्ये मात्र अपेक्षित गतीने कारवाई होत नाही. अनेक ठिकाणी बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच आहे.
पर्यायी व्यवस्थाही व्हावी
महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई केल्यानंतरही प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे थांबलेला नाही. प्लॅस्टिकच्या पिशव्यांना पर्यायी दुसºया पिशव्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे प्लॅस्टिकचा वापर केला जात आहे. महापालिका प्रशासन व सामाजिक संस्थांनी पर्यायी पिशव्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत काही व्यावसायीकांनी व्यक्त केले.
विभाग अधिकाºयांना सूचना
प्लॅस्टिकचा वापर नियंत्रित करण्यासाठी आणि पर्यावरणावर होणारे प्लॅस्टिकचे विपरीत परिणाम टाळण्यासाठी महापालिकेने प्लॅस्टिकविरोधी मोहीम सुरू ठेवण्याचे निर्देश सर्व विभाग अधिकाºयांना दिले आहेत. कुठेही प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन होत असल्यास तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
प्लॅस्टिमॅनची संकल्पना
नवी मुंबई महानगरपालिकेने सामाजिक संस्थांच्या सहकार्याने प्लॅस्टिमॅनची संकल्पना राबविण्यास सुरवात केली आहे. विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करून घेतले जात आहे. त्यांच्या माध्यमातून चॉकलेट, दुधाच्या पिशव्या, शँपूचे सॅशे व इतर कमी आकारात असलेले प्लॅस्टिकही संकलित केले जाणार आहे.
एप्रिल २०१८ ते मार्च २०१९
दरम्यान कारवाईचा तपशील
महिना कारवाई दंड जप्त प्लॅस्टिक
(किलो)
एप्रिल २१ १०५०० २
मे २ १०००० ०
जून ३६४ १५६७४०० ६७२१
जुलै ८६ ४३०००० ८२१
आॅगस्ट १२ ६०००० १८७
सप्टेंबर २ १०००० ९
आॅक्टोबर १७० ८६०००० २०९३३
नोव्हेंबर ६५ ३३५००० २७७
डिसेंबर ३७ १८०००० १०
जानेवारी ४० १५७२५० ८
फेब्रुवारी ४० २३५००० २६
मार्च १३० ७५०००० १०२१५