मुंबईच्या रेल्वे मार्गातील बाधित कांदळवनाची वृक्षारोपण भरपाई 900 किमी दूर, थेट गडचिरोलीत!

By नारायण जाधव | Published: November 30, 2023 10:41 AM2023-11-30T10:41:09+5:302023-11-30T10:41:53+5:30

एमआरव्हीसीला दिलेल्या पर्यावरणीय मंजुरीस पर्यावरणवाद्यांचा आक्षेप

900 km away, directly in Gadchiroli, tree plantation compensation for affected Kandal forest in Borivali-Virar railway line! | मुंबईच्या रेल्वे मार्गातील बाधित कांदळवनाची वृक्षारोपण भरपाई 900 किमी दूर, थेट गडचिरोलीत!

मुंबईच्या रेल्वे मार्गातील बाधित कांदळवनाची वृक्षारोपण भरपाई 900 किमी दूर, थेट गडचिरोलीत!

नवी मुंबई: मुंबईरेल्वे विकास मंडळाच्या बोरिवली-विरार दरम्यान रेल्वे प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. मात्र या प्रकल्पामुळे होणारे कांदळवनाचे नुकसान लक्षात घेऊन केंद्राने भरपाई वृक्षारोपण 900 किलोमीटर दूर गडचिरोली येथे करण्याचे निर्देश दिले आहेत. 

या मंजुरीवर आक्षेप घेऊन नवी मुंबईतील पर्यावरणवादी बी. एन. कुमार यांनी म्हणाले की, अशा प्रकारची भरपाई वृक्षारोपण हास्यास्पद आहे. बोरिवली ते विरार स्थानकांदरम्यान मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एम.आर.व्ही.सी च्या) प्रकल्पासाठी 12.8 हेक्टर क्षेत्रावर असलेल्या कांदळवनाचे 'डायव्हर्जन करण्याची' मंजुरी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसीने) दिली आहे आणि त्यासोबत वनीकरण करण्यासाठी अट घातली आहे. 

नोंदींमध्ये असे पाहायला मिळालेले आहे की, बोरिवली ते विरार या पाचव्या आणि सहाव्या लाइन्ससाठी केंद्राने 17 नोव्हेंबर रोजी तत्त्वत: मान्यता दिली होती. कुमार, जे नाटकनेक्ट फाऊंडेशनचे प्रमुख सुद्धा आहेत, असे मत मांडले आहे की, 12,000 हून अधिक कांदळवनातील झाडांचे डायव्हर्जन करण्याचा अर्थ कांदळवन नष्ट करणे असाच निघतो आणि सरकारने 900 किमी दूरवर वृक्षारोपण करून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे. अशा प्रकारच्या भरपाईमुळे गडचिरोलीच्या जंगलात मासे आणि खेकड्यांची पैदास होऊ शकते का आणि मुंबई किनारपट्टीवरील जैवविविधतेच्या नुकसानीची भरपाई गडचिरोलीत कशी काय होऊ शकते, असे प्रश्न कुमार यांनी केले आहेत. 

सिडकोच्या कोस्टल रोडची वृक्षारोपण भरपाई जळगावात

कुमार पुढे म्हणाले की अशा प्रकारचा "अविचारी" आदेश जारी करण्यात येण्याची ही पाहिली वेळ नाही. याआधी ऑक्टोबरमध्ये, सिडकोकडून बांधण्यात येत असलेल्या नवी मुंबई सागरी रस्त्यामुळे (कोस्टल रोडमुळे) होणाऱ्या कांदळवनाच्या नुकसान भरपाईसाठी जळगावच्या एका गावात एमओईएफसीसीने परवानगी दिली होती. 

मच्छीमारांचे मोठे नुकसान

श्री एकविरा आरी प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार म्हणाले, कांदळवनाचा विनाश थेट पर्यावरणावर आणि मच्छीमार समाजाच्या उपजीविकेवर परिणाम करतो. त्यामुळे मच्छीमार समाजाला सुद्धा नुकसानभरपाई द्यायला हवी. शेकडो मैल दूर करण्यात येणारे नुकसान भरपाई वृक्षारोपण निरुपयोगी ठरेल, असेही ती म्हणाले. 

सागरी व गडचिरोलीतील वृक्षसंपदा वेगवेगळी

“गडचिरोलीतील अधोगती झालेल्या (डिग्रेडेड) वनक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आमची काहीच हरकत नाही, खरे पाहिले तर हे करणे गरजेचे आहे”, असे पवार म्हणाले आणि कांदळवन नष्ट करण्याच्या बदल्यात हे करण्याची गरज नसल्यावर त्यांनी भर दिला.
कांदळवन आणि जमिनीवरील झाडे निसर्गाच्या जैवविविधतेत निराळ्या भूमिका बजावतात आणि त्यांच्याकडून त्यांच्या नैसर्गिक गुणांची अदलाबदल होणे असंभव आहे, असे पवार यांनी निदर्शनास आणून दिले. 

एमआरव्हीसीलावदिलेली वृक्षारोपणाची ही मंजुरी सामान्य ज्ञानावर गदा आणते, असे स्पष्ट मत पवार यांनी व्यक्त केले.

Web Title: 900 km away, directly in Gadchiroli, tree plantation compensation for affected Kandal forest in Borivali-Virar railway line!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.