पामबीचवर ९,३९८ चालकांनी तोडली वेगमर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 01:02 PM2023-05-23T13:02:30+5:302023-05-23T13:02:42+5:30
आरटीओची कारवाई : दीड वर्षात अनेकदा राबविली मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : उपप्रादेशिक परिवहन विभागाने पामबीच मार्गावर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या ९ हजार ३९८ वाहनांवर कारवाई केली आहे. नोव्हेंबर २०२१ पासून ते एप्रिल २०२३ दरम्यान राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही पामबीच मार्गावर अतिवेगाने वाहने पळवली जात असल्याचे पहायला मिळत आहे.
नवी मुंबईचा क्वीन नेकलेस म्हणून पामबीच मार्गाला ओळखले जाते. भुरळ घालणाऱ्या या मार्गावर वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे अनेकदा छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यात अनेकांचे प्राणदेखील गेले आहेत.
अनेकदा भरधाव वाहनचालकांकडून सिग्नल तोडल्यानेदेखील अपघात घडले आहेत. तर काही अपघात भरधाव वाहनाच्या आडवे दुसरे वाहन आल्यानेदेखील घडले आहेत. यावरून सर्वाधिक अपघात हे वेगमर्यादा ओलांडल्याने घडत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे पामबीच मार्गावर ६०ची वेगमर्यादा राखण्यात आली आहे. त्यानंतरही अनेक खासगी कार, दुचाकी यांच्याकडून वेगमर्यादा तोडली जात आहे.
त्यातच काही परवानगी नसलेल्या बसदेखील पामबीच मार्गावरून उघडपणे सुसाट धावत आहेत. त्यामुळे भविष्यात एखाद्या अपघातामध्ये एकापेक्षा अनेक व्यक्तीचे प्राण जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
कॅमेराच्या मदतीने वेगावर लक्ष
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने मागील दीड वर्षात तब्बल ९ हजार ३९८ वाहनचालकांवर केवळ वेगमर्यादा ओलांडल्याप्रकरणी कारवाई केली आहे. येत्या काळात पामबीच मार्गावर बसवल्या जाणाऱ्या स्पीड कॅमेराच्या मदतीने या कारवाया केल्या जाणार आहेत. त्यामुळे २४ तास पामबीच मार्गावरील वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवता येणे शक्य होणार आहे.
पामबीच मार्गावर मागील काही महिन्यांत वाहनचालकांनी वेग मर्यादा ओलांडल्याने अनेक अपघात झाले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या वाहनचालकांच्या वेग मर्यादेला आवर घालणे गरजेचे होते.