शहिदांच्या कुटुंबीयांना ९९ हजारांची मदत, मराठवाडा मित्र परिवाराची बांधिलकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 11:16 PM2019-03-04T23:16:59+5:302019-03-04T23:17:06+5:30
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील संजय राजपूत आणि नितीन राठोड हे दोन जवान शहीद झाले होते.
नवी मुंबई : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील संजय राजपूत आणि नितीन राठोड हे दोन जवान शहीद झाले होते. या शहिदांच्या कुटुंबीयांना नवी मुंबईतील मराठवाडा मित्र परिवार या संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थेच्या सदस्यांनी ऐच्छिक वर्गणीतून ९९ हजार रुपयांची रक्कम गोळा केली. ही रक्कम दोन शहीद कुटुंबांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान, याच उपक्रमाचा एक भाग म्हणून रविवारी मराठवाडा मित्र परिवारातर्फे खारघर येथील शिल्प गार्डनमध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई क्षेत्रात मराठवाडा येथील नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. मराठवाडावासीयांना संघटित करण्याच्या दृष्टीने सात वर्षांपूर्वी मराठवाडा मित्र परिवार या संस्थेची स्थापना करण्यात आली. शहरात राहत असलो तरी आपल्या मातीची, तेथील संस्कृतीची, चालीरिती, परंपरा याचा विसर पडता कामा नये, हा संस्थेच्या कार्याचा मुख्य गाभा राहिला आहे. त्यामुळेच संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोेजन करण्यात आले. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांसाठी संस्थेने नेहमीच मदतीचा हात दिला आहे. प्रत्येक टप्प्यावर सामाजिक बांधिलकीचे आत्मभान बाळगणाऱ्या या परिवाराने शहीद संजय राजपूत आणि नितीन राठोड परिवाराला आर्थिक मदत देवून एक वेगळा आदर्श ठेवला आहे.