९९०० विद्यार्थी देणार दहावीची सराव परीक्षा

By कमलाकर कांबळे | Published: January 4, 2024 08:18 PM2024-01-04T20:18:01+5:302024-01-04T20:18:28+5:30

गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन : ६ जानेवारीपासून भव्य शुभारंभ

9900 students will give 10th practice exam | ९९०० विद्यार्थी देणार दहावीची सराव परीक्षा

९९०० विद्यार्थी देणार दहावीची सराव परीक्षा

नवी मुंबई : विद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या परीक्षेची भीती दूर करून दहावीच्या मुख्य परीक्षेत त्यांच्या निकालाची टक्केवारी वाढविणारी श्री. गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित केली जाणारी एसएससी बोर्डाच्या धर्तीवर एसएससी सराव परीक्षेचा ६ जानेवारीपासून शुभारंभ होत आहे. यावर्षी या परीक्षेला ९९०० विद्यार्थ्यांंनी नाव नोंदणी केल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी खासदार संजीव नाईक आणि ट्रस्टचे सचिव तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सराव परीक्षा उपक्रमाचे यंदाचे २५ वे वर्ष आहे. १९९८ साली ऐरोली येथे या सराव परीक्षेची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी केवळ दोनच केंद्र होती. तसेच विद्यार्थ्यांची संख्या सुध्दा ५०० ते ६०० इतकी होती. मात्र मागील २५ वर्षात या परीक्षेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा परिणाम म्हणून या वर्षी ९९०० विद्यार्थ्यांनी सराव परीक्षेसाठी नाव नोंदणी केल्याची माहिती संजीव नाईक यांनी दिली. ६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. नवी मुंबईतील तब्बल ८५ शाळांनी सहभाग घेतला आहे. नवी मुंबईतील सराव परीक्षा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषा माध्यमातून घेतली जाते.

सराव परीक्षेचे रौप्य महोत्सवी वर्ष
एसएससी बोर्डप्रमाणे हॉलतिकीट, परीक्षा केंद्रे, प्रश्नपत्रिका तयार करणे आणि त्या तपासणे अशी सर्व कामे तज्ज्ञ शिक्षकांमार्फत केली जातात. अशाप्रकारे व्यापक स्वरूपात सराव परीक्षेचा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम असावा, असे संजीव नाईक यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, एसएससी सराव परीक्षेमुळे नवी मुंबईच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची टक्केवारीदेखील वाढल्याचे शिक्षक सांगतात. बघता-बघता एसएससी सराव परीक्षा उपक्रमाने रौप्य महोत्सवी पंचविसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. याचा आम्हाला विशेष आनंद असल्याचे प्रतिपादन संदीप नाईक यांनी केले.

 

Web Title: 9900 students will give 10th practice exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.