गच्चीतील जम्पिंग मशीनमुळे १२ वर्षीय मुलाचा झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 11:55 AM2022-02-24T11:55:56+5:302022-02-24T11:56:17+5:30
वाशीतली घटना : उंच उडून थेट कोसळला खाली
नवी मुंबई : टेरेसवर ठेवलेल्या जम्पिंग मशीनवरून उडून १२ वर्षीय मुलगा इमारतीवरून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. लॉकडाऊन कालावधीत मुलांच्या खेळण्याची सोय म्हणून हे जम्पिंग मशीन त्या ठिकाणी बसवण्यात आले होते. मात्र हेच मशीन या मुलासाठी जीवघेणे ठरले.
इशान गुप्ता (१२) असे इमारतीवरून पडून मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. तो वाशी सेक्टर १७ येथील महाराणी सोसायटी राहणारा असून, एनआरआय येथील खासगी शाळेत शिकत होता. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास तो सात मजली इमारतीच्या छतावर ठेवलेल्या जम्पिंग मशीनवर खेळत होता. यावेळी त्याने जम्पिंग मशीनवर मारलेल्या उडीमुळे तो सुरक्षा भिंतीपेक्षा अधिक उंच वर उडून इमारतीवरून खाली कोसळला. यावेळी त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी उपचार सुरु असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
लॉकडाऊन कालावधीत मुलांना सोसायटी आवाराबाहेर जाण्यावर बंधने आल्याने मुलांच्या खेळण्यासाठी ही जम्पिंग मशीन इमारतीच्या टेरेसवर ठेवण्यात आली होती. त्यानुसार मुले खेळताना टेरेसवरील जागेच्या मध्यभागी ती ठेवणे आवश्यक होते. मात्र सोमवारी रात्री हे जम्पिंग मशीन टेरेसच्या सुरक्षा कठड्याला लागूनच ठेवले होते. यामुळे त्यावर इशान हा खेळत असताना तो उंच उडाला जाऊन भिंतीवरून खाली कोसळला. त्यात तो गंभीर जखमी झाला असता उपचारादरम्यान मृत पावल्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश चव्हाण यांनी सांगितले. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद वाशी पोलीस ठाण्यात केली असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
इशानचे डोळे दान करण्याचा निर्णय
अवघ्या वयाच्या बाराव्या वर्षी इशानच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरत त्यांनी इशानचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मृत्यूनंतर देखील इशान जग पाहू शकणार आहे. शिवाय दुःखद प्रसंगात देखील कुटुंबाने घेतलेल्या निर्णयाने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.