लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्हॅलेंटाईन डे दिवशी तब्बल ४७९ पेट्या हापूसची आवक झाली. फेब्रुवारीत पहिल्यांदाच एवढी आवक झाली असल्यामुळे बाजार पेठेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. होलसेल मार्केटमध्ये ४ ते ७ डझनच्या पेटीला ३५०० ते ८ हजार रुपये भाव मिळत आहे.
यावर्षी कोकणामध्ये आंब्याचे पीक चांगले असून ग्राहकांना लवकर व परवडेल, अशा दरामध्ये आंबा मिळेल, असे संकेत प्राप्त होत आहेत. गतवर्षी एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. परंतु, यावर्षी मार्चमध्येच मुबलक आंबा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यंदा थंडीही माेठ्या प्रमाणात असल्याने आंब्याला चांगला माेहाेर आला हाेता. त्यामुळे मार्चपासून माेठ्या प्रमाणात आंबा मुंबईच्या बाजारपेठेत दाखल हाेईल, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे. त्यामुळे भावही कमी हाेतील. बाजार समितीमधील फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले की, यावर्षी आंबा पीक चांगले आहे. हंगाम लवकर सुरू झाला असून मार्चमध्ये आवक भरपूर होऊन आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात येईल.
आवक वाढलीमागील काही दिवसांपासून कोकणातून हापूसची काही प्रमाणात आवक होत आहे. १४ फेब्रुवारीला तब्बल ४७९ पेट्या आवक झाली. व्हॅलेंटाईन डे दिवशीच आवक वाढली असून ही फेब्रुवारीमधील आतापर्यंतची सर्वाधिक आवक आहे. आंब्याच्या दर्जाप्रमाणे ४ ते ७ डझनच्या पेटीला मार्केटमध्ये ३५०० ते ८ हजार रुपयांचा दर मिळत आहे.