"तुम्ही जेवण करून घ्या..." माऊलीचे अखेरचे शब्द; लाखोंची गर्दी मात्र आई गमावली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 08:16 PM2023-04-17T20:16:17+5:302023-04-17T20:17:05+5:30
मिस्त्री यांच्या निधनाने कुटुंबात शोककळा पसरली आहे
पनवेल - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला लाखोंचा जनसमुदाय रणरणत्या उन्हात मैदानावर जमला होता. त्यातील काहींना उष्माघाताचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात नेले. परंतु उपचारावेळी यातील १२ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने मृत श्रीसेवकांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेत मीनाक्षी मिस्त्री नावाच्या महिला श्रीसेवकाचाही मृत्यू झाला आहे.
मिस्त्री यांच्या निधनाने कुटुंबात शोककळा पसरली आहे. याबाबत मिनाक्षी मिस्त्री यांचा मुलगा प्रीतिष मिस्त्री म्हणाला की, आई सकाळी ५.३० च्या सुमारास निघाली होती. ७.३० वाजता आईचा कॉल आला तुम्ही जेवण करून घ्या असं तिने सांगितले. त्यानंतर मावशीने ११ वाजता आईला कॉल केला परंतु तिने उचलला नाही. मी कॉल केला पण तोही उचलला नाही. संध्याकाळी साडेसहा वाजता घरी आल्यावर मी बातमी पाहिली तेव्हा मला टेन्शन आले. मी सातत्याने कॉल केला परंतु फोन स्विचऑफ लागत होता.
त्यानंतर मी माझ्या मित्रांसह शोध घेतला. आईसोबत दुसरे कुणी नव्हते त्यामुळे तिला शोधणे कठीण झाले. मी खारघर पोलिसांनी फोटो दाखवला तेव्हा मृतांमध्ये ती महिला असल्याची पोलिसांनी सांगितले. ओळख पटवली. तिच्या चेहऱ्यावर थोडा मार लागलेला. चक्कर येऊन ती खाली कोसळली असावी. पोलिसांनी पुढची माहिती दिली असं प्रीतिषने सांगितले.