नवी मुंबई:नवी मुंबई शहर हे सुनियोजित शहर असून त्याला उद्यानाचे शहर म्हणून ओळखले जाते. शहराला विस्तीर्ण खाडी किनारा लाभला असून या खाडीत जगप्रसिद्ध अशा फ्लेमिंगो व विविध पक्षाचा तसेच फुलपाखरांचा वावर असतो. याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आ. मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची भेट घेऊन नवी मुंबई येथील सारसोळेत पामबीच लगत असलेल्या 12 एकर भूखंडावर फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) उभारण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. त्यानुसार शिंदे नगरविकास सचिवाना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
म्हात्रे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) ची संकल्पना हळूहळू भारतात रुजायला लागली आहे. फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) नेमका काय आहे ? तो कसा उभारतात ? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. भारतात अनेक ठिकाणी तसेच वैयक्तिक असे फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) उभारले गेले आहेत. जसे सिंगापूरच्या धर्तीवर नवी मुंबईत बटरफ्लाय गार्डन बनविल्यास ते एक सुंदर पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास येईल. तसेच उद्यानातील विविध प्रकारचे रंगबेरंगी फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) पाहण्यसाठी पर्यटकांची संख्याही वाढेल.
या फुलपाखरू उद्यानामुळे नवी मुंबईचा दर्जा ही वाढणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार निर्माण होईल व नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात भर पडून पर्यटनाला चालनाही मिळेल. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना या बाबत तपासणी करून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. नवी मुंबई शहर आधीच फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळखले जाते.