नवी मुंबई: मृत व्यक्तीच्या नावे असलेले दोन भूखंड हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांवर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूखंड हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु असताना हा प्रकार निदर्शनात आला होता. त्यानुसार प्रक्रिया थांबवून सिडकोची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघरच्या ओवे गाव परिसरातील दोन भूखंड हडपण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणचे दोन भूखंड गफूरमिया शेख यांच्या नावे असून त्यांचे काही वर्षांपूर्वी सौदी अरेबिया येथे निधन झाले आहे. यादरम्यान सहा जणांनी स्वतःला त्यांचे वारसदार भासवून त्यांच्या नावे असलेले दोन भूखंड स्वतःच्या नावे करून घेण्यासाठी सिडकोकडे अर्ज प्राप्त झाला होता. यासाठी संबंधितांनी त्यांचा वारसदाखला सिडकोकडे सादर केला होता.
त्याद्वारे सिडकोने भूखंड हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु केली होती. याचदरम्यान सिडकोला निनावी पत्र प्राप्त झाले होते, त्यामध्ये सदर वारसदाखला बनावट असल्याचे कळवण्यात आले होते. त्याद्वारे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दाखल्याची सत्यता पडताळली केली असता दाखला बनावट असल्याचे समोर आले. त्यानुसार २१ मार्चला सिडकोने याप्रकरणी सीबीडी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. त्याद्वारे अब्दुल अजीज गफूरमिया शेख, अब्दुल कय्युम गफूरमिया शेख, सहिदाबी गुलाम हुसेन शेख, मुमताज नजीर शेख, सादिका अब्दुल रशीद शेख व आमीनाबीबी गफूरमिया शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.