कंटेनरला भरधाव सिमेंट मिक्सरची धडक; सायन पनवेल मार्गावरील नेरुळ येथील घटना
By सूर्यकांत वाघमारे | Published: November 16, 2023 07:54 PM2023-11-16T19:54:47+5:302023-11-16T19:55:35+5:30
कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारा सिमेंट मिक्सर धडकल्याची घटना नेरुळ येथे घडली.
नवी मुंबई: कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारा सिमेंट मिक्सर धडकल्याची घटना नेरुळ येथे घडली. या अपघातामध्ये सिमेंट मिक्सर वाहनाचा चालक केबिनमध्ये अडकला होता. अपघातानंतर प्रत्यक्षदर्शी नागरिक व वाहतूक पोलिसांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे सायन पनवेल मार्गावर सुमारे दोन तासासाठी वाहतूक धीमी झाली होती.
सायन पनवेल मार्गावर नेरुळ येथे गुरुवारी दुपारी दिडच्या सुमारास हा अपघात घडला. पुणेकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबला असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव सिमेंट मिक्सर चालकाला अंदाज न आल्याने कंटेनरला धडक बसली. यामध्ये सिमेंट मिक्सर वाहनाचा पुढचा भाग चेपला गेल्याने चालक केबिनमध्ये जखमी अवस्थेत अडकला होता. अपघाताची माहिती मिळताच तुर्भे वाहतूक शाखा पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. तर अपघातानंतर दोन्ही वाहने बंद पडून रस्त्याच्या तीन लेन अडवल्या गेल्याने वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झाला होता. अखेर प्रत्यक्षदर्शी नागरिक व वाहतूक पोलिसांनी सिमेंट मिक्सरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान दोन्ही वाहने रस्त्यावरच बंद पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. यावेळी एका लेनमधून वाहने सोडून वाहतूक कोंडी टाळण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून झाला. तर दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने मार्गावरून हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी सांगितले. या अपघातामुळे त्याठिकाणी सुमारे दोन तास वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.