उद्यानात खेळणाऱ्या मुलाला उघड्या विद्युत बॉक्सचा शॉक; सानपाडामधील उद्यानातील घटना
By नामदेव मोरे | Published: March 19, 2024 07:18 PM2024-03-19T19:18:48+5:302024-03-19T19:19:11+5:30
सानपाडा सेक्टर ४ मधील स्वामी मोहनानंद गिरिजा उद्यानामध्ये खेळत असताना उघड्या विद्युत बॉक्समुळे कुणाल कनोजीया या १३ वर्षाच्या मुलाला विजेचा धक्का बसला.
नवी मुंबई: सानपाडा सेक्टर ४ मधील स्वामी मोहनानंद गिरिजा उद्यानामध्ये खेळत असताना उघड्या विद्युत बॉक्समुळे कुणाल कनोजीया या १३ वर्षाच्या मुलाला विजेचा धक्का बसला. त्याच्यावर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. येथील उद्यानाच्या संरक्षण भिंतीच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. या ठिकाणच्या विद्यूत बॉक्सचे झाणक गायब झाले आहे. ठेकेदाराने वेळेत दुरूस्ती केली नाही व सुचना फलकही लावले नव्हते.
सोमवारी सायंकाळी परिसरातील मुले उद्यानामध्ये खेळण्यासाठी गेले होते. यावेळी कुणाल कणोजीया याला विजेचा धक्का बसला. त्याचा हात भाजला असून त्याला उपचारासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयात नेण्यात आले आहे. ठेकेदाराने योग्य काळजी घेतली नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. परिसरातील नागरिक निलेश कचरे यांनी याविषयी महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.सानपाडामधील दुर्घटनेची चौकशी करावी. निष्काळजीपणाला जे जबाबदारी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. शहरातील इतर उद्यानांमधील विद्यूत डीपीबॉक्सची पाहणी करून तत्काळ दुरूस्ती करण्याची सूचनाही केली आहे.