मधुकर ठाकूर -
उरण : करंजा - द्रोणागिरी मंदिरापासून चारफाटा येथील डाऊरनगरपर्यंतच्या सुमारे चार किलोमीटर क्षेत्रात डोंगराच्या पायथ्याशी जवळपास असलेली एक हजार कच्ची-पक्की घरे दरडींच्या सावटाखाली आहेत. शासनाच्या विविध खात्यांच्या आणि काही ठेकेदारांच्या अल्पशा आर्थिक लोभापायी द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी सातत्याने होणाऱ्या उत्खननामुळे मागील दोन वर्षांपासून दरड कोसळण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे हजारो रहिवासी मृत्यूच्या दरडींखाली जीवन जगत आहेत.
डोंगराच्या पायथ्याशी सातघर, गोकुळनगर, तांडेलनगर, गणेशनगर, डाऊरनगर या लोकवस्तीत सुमारे एक हजारांच्या आसपास कच्ची-पक्की घरे आहेत. तर ओएनजीसीच्या समुद्राकडील बाजूला काही आदिवासी वस्ती आहे. जागा अधिकृत की अनधिकृत याचा मागचा-पुढचा विचार न करता शेकडो गरीब-गरजूंनी विविध बिल्डरांकडून जागा खरेदी करून आयुष्याची पुंजी खर्च करून घरे बांधली आहेत.
महत्त्वाचे म्हणजे करंजा-रेवस रो-रो सेवेचा आरक्षित रस्ता याच मार्गाने जाणार आहे. त्याच्या आरक्षणात शेकडो घरे बाधित होणार आहेत. मात्र, याकडे विविध शासकीय विभागांनी दुर्लक्ष केल्याने बेकायदा बांधकामांना ऊत आला आहे. अशातच मागील १०-१२ वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जात आहे. यामुळे डाेंगराचा वरचा भाग कमजोर होऊन दोन वर्षांपासून दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
शासकीय यंत्रणाच चिमूटभर मिळणाऱ्या रॉयल्टीसाठी हपापलेली आहे, असा आरोप उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी केला आहे. तर द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी सुरू असलेले उत्खनन थांबविण्यासाठी तहसीलदारांपासून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रारी, निवेदन दिली आहेत, असे नवापाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मनोहर कोळी यांनी सांगितले.
पर्यायी जागेबद्दल विचार सुरू द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. पायथ्याशी वसलेली वस्ती हटवून पर्यायी जागेत हलविणे, सध्या तरी हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायाबाबत विचारविनिमय सुरू असून, त्याचा अहवाल शासनाकडे लवकरच पाठविणार असल्याची माहिती उरण तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली.
द्रोणागिरी नाव कसे पडले ?उरण तालुक्यातील चाणजे महसुली हद्दीत द्रोणागिरी डोंगर आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरच असलेल्या या डोंगराच्या निर्मितीबाबत एक पौराणिक दंतकथा प्रचलित आहे. राम-रावण युद्धात मूर्छीत लक्ष्मणाला दिव्य औषधी वनस्पती असलेला डोंगरच हनुमान हवाई मार्गाने नेत असताना पडलेला ढेकूळ म्हणजेच द्रोणागिरी डोंगर, अशी आख्यायिका आहे. सध्या त्याच्या पायथ्याशी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ओएनजीसी प्रकल्प आहे.