नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा! सुपर स्वच्छ लीग गटात देश पातळीवर पहिल्या तीनमध्ये झाला समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:50 IST2025-01-21T10:49:46+5:302025-01-21T10:50:04+5:30
Navi Mumbai : स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई शहराला आणखी एक मानांकन प्राप्त झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नव्याने समाविष्ट केलेल्या सुपर स्वच्छ लीग कॅटेगरीत नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे.

नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा! सुपर स्वच्छ लीग गटात देश पातळीवर पहिल्या तीनमध्ये झाला समावेश
नवी मुंबई - स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई शहराला आणखी एक मानांकन प्राप्त झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नव्याने समाविष्ट केलेल्या सुपर स्वच्छ लीग कॅटेगरीत नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देशातील तीनच शहरांचा या कॅटेगरीत समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील एकमेव म्हणजेच नवी मुंबई शहरासह मध्य प्रदेशच्या इंदौर आणि गुजरातच्या सुरतचा समावेश आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई शहराने आपले स्थान अबाधित ठेवले आहे. २०२३ मध्ये देशातील द्वितीय क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई महापालिकेला मानांकन प्राप्त झाले होते. स्वच्छ सर्वेक्षणात सातत्याने अग्रक्रमावर राहिलेल्या शहरांसाठी गेल्या वर्षीपासून ‘सुपर स्वच्छ लीग’ ही नवीन कॅटेगरी निर्माण केली आहे.
आनंदाची आणि गौरवाची बाब
याअंतर्गत देशातील १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रमुख शहरांच्या मुख्य गटात तीन शहरांचा समावेश केला असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई, मध्य प्रदेशातील इंदौर आणि गुजरातमधील सुरत या तीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, नवी मुंबईकरांच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची आणि गौरवाची बाब असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी म्हटले आहे.
सुपर लीगमुळे गुणांकनाचे स्वरूप बदलले; दहा हजार गुणांचे मूल्यमापन असणार
सुपर लीगमध्ये समावेश झाल्याने स्वच्छ सर्वेक्षणातील गुणांकनाचे स्वरूप बदलले आहे. त्यानुसार आता १० हजार गुणांचे मूल्यमापन असणार आहे.
त्या गुणांच्या वर्गवारीमध्ये प्रत्यक्ष दर्शनी स्वच्छतेला १५०० गुण, घन कचऱ्यावरील शास्त्रोक्त प्रक्रियेकरिता १५०० गुण तसेच जनजागृती उपक्रमांसाठी १५०० गुण असणार आहेत.
त्याचप्रमाणे वर्गीकृत कचरा संकलनाकरिता १००० गुण, शौचालय व्यवस्थापनासाठी १००० गुण, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुन:उपयोगाकरिता १००० गुण तसेच कचरा व्यवस्थापनात माहिती तंत्रज्ञानाच्या वापरासाठी १००० गुण असणार आहेत.
तसेच तक्रार निवारणासाठी ५०० गुण, मलनि:सारण ५०० गुण आणि स्वच्छताकर्मीच्या कल्याणकारी कामांसाठी ५०० गुण अशा प्रकारे एकूण १०,००० गुणांनुसार सर्वेक्षण केले जाणार आहे.
त्याशिवाय कचरामुक्त शहर मानांकनासाठी २५०० गुण व ओडीएफ वॉटर प्लस मानांकनासाठी २५०० गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.