नवी मुंबई : गोठीवली येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात चोरीची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी मंदिराचे टाळे तोडून आत प्रवेश करून हे कृत्य केले आहे. त्यांनी दोन्ही मूर्तीचे चांदीचे मुकुट चोरी केले आहेत.
गोठीवली येथील मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. सकाळी मंदिरात काहीजण गेले असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटले असल्याचे दिसून आले. यामुळे मंदिरात चोरी झाल्याचे स्पष्ट होताच रबाळे पोलिसांना कळवण्यात आले.
अज्ञातांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु ती फोडण्यात त्यांना यश न आल्याने त्यांनी गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोड आत प्रवेश केला. त्याठिकाणी मूर्तीवर असलेले चांदीचे मुकुट त्यांनी चोरले. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अधिक चौकशीत संशयितांची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याद्वारे त्यांचा शोध सुरु आहे.