मधुकर ठाकूर
उरण : सातत्याने होणाऱ्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे जुन्या खोपटा पुलावरील पोच मार्गावर पडलेला धोकादायक खड्डा शनिवारी (५) सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने बुजवून टाकला आहे. उरण पूर्व विभागाशी जोडणाऱ्या खोपटा पुलाची उभारणी ही राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांनी केली होती. या जुन्या खोपटा पुलावरून क्षमतेपेक्षा अधिक टनांच्या मालाची वाहतूक होत आहे.
सातत्याने जुन्या पुलावरुन मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या एकेरी जड अवजड वाहतुकीमुळे पुलाची कार्यक्षमता क्षीण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाहतुकीमुळे मात्र या नव्या आणि जुन्या अशा दोन्ही पुलावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास दररोज ये-जा करणाऱ्या हजारो नागरिक,कामगार, नोकरदार, विद्यार्थींना सहन करावा लागत आहे. यामध्ये भरीस भर म्हणून की काय शनिवारी (५) जुन्या खोपटा पुलावरील पोच मार्गावर भलामोठा खड्डा पडला होता. हा भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली होती.
हे लक्षात घेऊन काही वाटसरुंनी ही बाब वाहन चालकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी खड्ड्यात झाडांची फांदी उभी करून सावध करण्याचा प्रयत्न केला होता. तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याप्रकरणी उरण सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला होता. उरण विभागाचे उप अभियंता नरेश पवार यांनीही त्वरीत लक्ष घालून पुलाच्या पोचमार्गावर पडलेला भलामोठा धोकादायक खड्डा दगडमातीचा भराव टाकून बुजवून टाकला.यामुळे मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
जुन्या खोपटा पुलावरील पोच मार्गावर पडलेला धोकादायक ठरू पाहाणारा खड्डा बुजवून टाकला आहे. तीन महिन्यांपूर्वीच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली आहे. पाहणीनंतर अधिकाऱ्यांनी पुलाला धोका नसल्याचा अभिप्राय नोंदविला असल्याची माहिती उरण विभागाचे उप अभियंता नरेश पवार यांनी दिली.