पाळलेले मांजर अजगराने गिळले, त्याला मारायला मालक धावला, मांजर मेले अजगर मात्र वाचला...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 08:49 AM2023-08-09T08:49:56+5:302023-08-09T08:50:10+5:30
१० फुटाचा अजगर बिनविषारी होता म्हणून...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सीबीडी सेक्टर ८ मधील अष्टविनायक सोसायटीमध्ये एक मोठा अजगर आढळून आला होता. पुनर्वसू फाउंडेशनच्या सर्पमित्रांनी या अजगराची सुटका केली आहे. अजगराला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने मांजर खाल्ल्याचे सर्पमित्रांच्या लक्षात आले. आपण पाळलेले मांजर अजगराने गिळल्याचे कळताच त्याचा मालक अजगराला मारण्यासाठी आला, मात्र सर्पमित्रांनी त्याची समजूत काढली.
सोसायटीच्या आवारात अडकलेल्या अजगराची सर्पमित्रांनी सुटका केली. अष्टविनायक सोसायटीमधील पार्किंगच्या जागेत एक मोठा सर्प असल्याची माहिती तेथील नागरिकांनी पुनर्वसू फाउंडेशनला फोन करून दिली. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र अष्टविनायक मोरे यांनी त्यांचे सहकारी भरत पुजारी यांना सोबत घेतले. हा बिनविषारी भारतीय जातीचा १० फुटी अजगर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याने काहीतरी मोठी शिकार केली असल्याने त्याला बऱ्याच वेळापासून हलता येत नव्हते. सर्पमित्रांनी बचावकार्य सुरू केले. थोड्याच वेळात अजगराने एका मोठ्या मृत मांजराला बाहेर काढले.
जंंगलात सोडले
n मांजराच्या मालकाला हे कळताच तो अजगराला मारण्यासाठी आला. परंतु, सर्पमित्र अष्टविनायक व भरत यांनी त्यांची समजूत घातली. निसर्गामध्ये राहणारे सर्व जीव एकमेकांवर अवलंबून असतात. ती निसर्गाची अन्नसाखळी असते.
n प्राणी शिकार करतात, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सर्पमित्रांनी तेथील नागरिकांना सापाची माहिती दिली. अजगराला सुखरूपपणे ताब्यात घेतले. अजगराची पाहणी करून त्याची माहिती वनविभागास कळवून त्यास जंगलात सोडले.