नवी मुंबई : पनवेल-ठाणे लोकलमध्ये रविवारी रात्री दारूच्या नशेत महिलांच्या डब्यात शिरलेल्या एका मद्यपीस ड्युटीवरील पोलिसाने खाली उतरण्यास सांगितले असता त्याने त्यास नकार देऊन त्या पोलिसास मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर लोकल कोपरखैरणे स्थानकात आल्यावर बाजूच्या डब्यातील प्रवाशांनी येऊन त्या मद्यपीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही त्याने ऐकले नाही. अखेर लोकल ठाणे रेल्वेस्थानकात आल्यावर तेथील पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. भालेंद्र लक्ष्मण द्विवेदी असे त्या मद्यपीचे नाव असून त्याने पोलिस शिपाई आकाश भारूडसोबत हे वर्तन केले. ते ठाणे पोलिसांत कार्यरत आहेत.
रविवारी रात्री रात्री सव्वा अकराच्या सुमारास आराेपी भालेंद्र लक्ष्मण द्विवेदी हा मद्याच्या नशेत जुईनगर स्थानकात महिलांच्या डब्यात शिरला. त्यावेळी ड्युटीवर असलेले भारूड यांच्यासह इतर दोन महिला प्रवशांनी त्यास खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, त्यास नकार देऊन त्याने हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. हा गुन्हा जुईनगर ते कोपरखैरणे रेल्वेस्थानकादरम्यान घडल्याने ठाणे रेल्वे पोलिसांनी द्विवेदी याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला पुढील कार्यवाहीसाठी वाशी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.