स्वस्त भाजीपाल्यासाठी शेतकरी बाजारचा पर्याय; आठवडे बाजारांच्या प्रसिद्धीकडेही शासनाचे दुर्लक्
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 06:44 AM2024-07-27T06:44:31+5:302024-07-27T06:44:41+5:30
शेतकरी व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन शासनाने १२ ऑगस्ट २०१६ मध्ये संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडे बाजार हे अभियान सुरू केले.
नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला, फळे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने संत शिराेमणी सावता माळी आठवडे शेतकरी बाजार योजना सुरू केली. मुंबई, नवी मुंबईमध्येही बाजार सुरू झाले. त्याचा लाभ ग्राहकांना होत आहे; परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात या बाजारांची संख्या कमी आहे. कुठे कधी बाजार भरणार याविषयी शासनाकडून प्रसिद्धीही केली जात नसल्यामुळे या आठवडे बाजारांचा अपेक्षित लाभ होत नाही.
शेतकरी व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन शासनाने १२ ऑगस्ट २०१६ मध्ये संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडे बाजार हे अभियान सुरू केले. पहिल्या टप्प्यात मुंबई, नवी मुंबई, पुणेमध्ये प्रत्येक विभागात आठवड्यातून एक दिवस आठवडे बाजार भरविण्याचे निश्चित केले. नवी मुंबईमध्ये सीवूड, एनआरआय, सेक्टर १५ बेलापूर, राजीव गांधी मैदान व वाशी अशा पाच ठिकाणी आठवडे बाजार भरविला जात आहे. या उपक्रमाला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. इतर मार्केटपेक्षा कमी दरात भाजीपाला उपलब्ध होत आहे; परंतु आठ विभाग कार्यालयांपैकी २ विभाग कार्यालयांच्या क्षेत्रामध्येही आठवडे भरत आहे. उर्वरित ६ विभाग कार्यालय क्षेत्रामध्ये अद्याप ही योजना पोहोचलेली नाही. मुंबईमध्येही ६ ठिकाणी आठवडे बाजार सुरू केला आहे; परंतु या दोन्ही शहरांची व्याप्ती पाहता हे बाजारांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
शेतकरी आठवडे बाजार पूर्वी पणन मंडळाच्या माध्यमातून चालविला जात होता. आता हा उपक्रम कृषी विभागाकडे वर्ग केला असल्याची माहिती पणन विभागाच्या कार्यालयातून देण्यात आली. आठवडे बाजारच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्त दरात कृषिमाल उपलब्ध करून देणे शक्य आहे; परंतु बाजारांची संख्या
वाढविली जात नसल्यामुळे चांगली योजना असून प्रत्यक्षात महागाई कमी करण्यासाठी त्याचा फारसा उपयाेग होताना दिसत नाही.
बाजार समितीमध्येही स्वस्त विक्रीची सोय
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होलसेलसोबत किरकोळ भाजीपाला विक्रीही सुरू केली आहे. येथील ‘डी-विंग’मध्ये किरकोळ विक्रीची सोय आहे. मुंबई, नवी मुंबईमधील इतर किरकोळ मार्केटपेक्षा २५ ते ३० टक्के कमी दराने येथे भाजीपाला उपलब्ध होत आहे. या ठिकाणी संपूर्ण नवी मुंबईमधून ग्राहक खरेदीसाठी येत असतात; परंतु या व्यापाराला अधिकृत मंजुरीच नाही.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर व वाशी विभागात शेतकरी बाजार सुरू आहे. या उपक्रमासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे विविध विभागांत अर्ज आले व तेथे जागेची उपलब्धता होत असेल व वाहतुकीसह इतर समस्या निर्माण होणार नसतील तर परवानगी देता येईल.
- सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त बाजार समिती.
ष