नवी मुंबई : ठाणे बेलापूर औद्योगीक वसाहतीमधील इंदिरानगर गणपतीपाडा येथील बंद कंपनीच्या आवारातील भंगार साहित्याला शुक्रवारी रात्र आग लागली. आगीमध्ये भंगार साहित्य जळून खाक झाले आहे. या ठिकाणी अवैधपणे भंगार व्यवसाय सुरू होता. रात्री अमलीपदार्थ ओढणारांचा अड्डाही या ठिकाणी सुरू झाला होता.
गणपतीपाडा येथील पुरातन रानातल्या गणपती मंदिराच्या समोरील बाजूला अनेक वर्षापासून एक कंपनी बंद पडली आहे. या कंपनीच्या आवारात भंगार व्यवसाय सुरू होता. अवैधपणे हा व्यवसाय सुरू होता. याच परिसरात गांजा व इतर अमली पदार्थ ओढणारांची ये -जा असायची. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या आवारातील भंगार साहित्याला आग लागली. एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली आहे.अमलीपदार्थ ओढणारांनीच ही आग लावली असण्याची शक्यता आहे. येथील सर्व भंगार साहित्य जळून गेले आहे.
एमआयडीसीमधील अनेक बंद कंपन्यांचा ताबा अमली पदार्थ ओढणारांनी व भंगार व्यवसायीकांनी घेतला आहे. हे अवैध व्यवसाय थांबविण्यात यावेत अशी मागणी शिवसेना उपशहर प्रमुख महेश कोठीवाले यांनी केली आहे. याविषयी पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त व एमआयडीसी प्रशासनाला पत्रव्यवहार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.